माऊंट मोंगेनुई : भारतीय महिला संघाला आयसीसी विश्वचषकात बुधवारी महत्त्वाच्या सामन्यात वेगवान माऱ्यापुढे सुमार फलंदाजीचा फटका बसला. गतविजेत्या इंग्लंडने भारताचा चार बळी राखून पराभव करीत जेतेपदाच्या बचावाची आशा पल्लवित केल्या आहे.
फलंदाजीतील गलथानपणामुळे भारतीय संघ केवळ १३४ पर्यंतच मजल गाठू शकला. इंग्लंडने ३१.२ षटकात लक्ष्य गाठून सलग तीन पराभवाची मालिका खंडित केली. स्मृती मानधनाने सर्वाधिक ३५, तर यष्टिरक्षक रिचा घोष हिने ३३ धावा केल्या. ठराविक अंतराने फलंदाज बाद झाल्याने संपूर्ण संघ ३६.२ षटकात गारद झाला. इंग्लंडकडून चार्ली डीनने २३ धावात ४ आणि आन्या श्रुबसोलने २० धावात २ बळी घेतले.
यानंतर इंग्लंडची सुरुवातही खराब झाली. तिसऱ्या षटकात त्यांनी चार धावांत दोन्ही सलामीवीर गमावले. डॅनी वॅट (१) आणि टॅमी ब्युमोंट (१) बाद झाल्यानंतर कर्णधार हिथर नाईटने ७२ चेंडूत आठ चौकारांसह नाबाद ५३ धावांचे योगदान देत इंग्लंडचा विजय ३१.२ षटकात ६ बाद १३६ असा साकार केला. वेगवान गोलंदाज मेघना सिंग हिने २६ धावात ३ बळी घेतले.
अनुभवी झुलन गोस्वामीने ब्युमोंटला पायचित केले. पंचांनी ब्युमोंटला बाद दिले नव्हते; मात्र डीआरएसमध्ये ती बाद झाली. यासह झुलनने वन डेत २५० बळींचा टप्पा गाठला. नाईट-नताली स्कीवर (४६ चेंडूत ४५ धावा) यांनी तिसऱ्या बळीसाठी ६५ धावांची भागीदारी केली. सुरुवातीचे तीन सामने गमावणाऱ्या इंग्लंडसाठी ही लढत ‘करा किंवा मरा’ अशीच होती. त्यांनी विजयाचे खाते उघडले. भारत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर कायम आहे.