जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेतील आठ अव्वल क्रिकेट स्टेडियमची २०२७ आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनासाठी निवड करण्यात आली आहे. त्यात जोहान्सबर्ग येथील वाँडरर्स, डर्बनमधील किंग्समीड आणि केपटाऊन येथील न्यूलँड्स स्टेडियमचा समावेश आहे.
दक्षिण आफ्रिकेतील एका वृत्तवाहिनीने बुधवारी ही माहिती दिली. विश्वचषक २०२७ चे आयोजन ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया हे देश संयुक्तपणे करणार आहेत. क्रिकेट दक्षिण आफ्रिकाचे मुख्य कार्यकारी अधिकारी फोलेत्सी मोसेकी म्हणाले की, ‘स्पर्धेचे आयोजन स्थळ हे हाॅटेल आणि विमानतळ यांची उपलब्धता पाहून निश्चित करण्यात आले आहे. ठिकाणांची निवड करण्यासाठी हाॅटेलांतील खोल्यांची संख्या आणि विमानतळांची उपलब्धता यांचा विचार करण्यात आला. आमच्याकडे आयसीसीची मान्यताप्राप्त ११ ठिकाणे आहेत. त्यामुळेच तीन ठिकाणे सोडणे अवघड होते, पण अनेक बाबींचा विचार करून निर्णय घेण्यात आला.’
दक्षिण आफ्रिकेत स्पर्धेतील मुख्य ठिकाणे वाँडरर्स, प्रिटोरियातील सेंचुरियन पार्क, किंग्समीड, गकेबरहा येथील सेंट जाॅर्ज पार्क, पर्ल येथील बोलँड पार्क आणि न्यूलँड्स ही आहेत, तर ब्लोमफोंटेनमधील मॅनगौंग ओव्हल आणि ईस्ट लंडनमधील बफेलो पार्क येथेही काही सामने होतील.
२००३ सालच्या विश्वचषक स्पर्धेप्रमाणे रचनाअन्य सामने झिम्बाब्वे, नामिबिया येथे होतील. यजमान दक्षिण आफ्रिका व झिम्बाब्वे स्पर्धेसाठी थेट पात्र ठरले आहेत. पण, नामिबियाला आफ्रिकी पात्रता फेरीतून जावे लागेल. एकदिवसीय क्रमवारीतील अव्वल आठ संघ स्पर्धेसाठी थेट पात्र ठरतील, तर अव्वल चार संघ पात्रता फेरीतून निश्चित होतील. स्पर्धेत सात संघांचे दोन गट होतील. विश्वचषक २००३ प्रमाणे संघांचे गट ठरवण्यात आले आहेत.