World Cup Semi Final Scenario : श्रीलंकेच्या संघाची आयसीसी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील मोहिमेची सुरुवात चांगली झालेली नाही. त्यांचे दोन प्रमुख खेळाडू दुष्मंथा चमिरा आणि वनिंदू हसरंगा दुखापतींमुळे खेळू शकले नाहीत. त्याचा फटका त्यांना स्पर्धेत बसलेला पाहायला मिळतोय. त्यांना पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून दारूण पराभव पत्करावा लागला. दक्षिण आफ्रिकेने त्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ५ बाद ४२८ धावांचा डोंगर उभा केला.
कुसल मेंडिस आणि चरिथ असलंका यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु लक्ष्याचा पाठलाग करणे त्यांना नाही जमले. श्रीलंकेला केवळ ३२६ धावा करता आल्या आणि त्यांना १०२ धावांनी पराभव पत्करावा लागला. हैदराबादमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या पुढील सामन्यात, कुसल मेंडिस आणि सदीरा समरविक्रमाने शानदार शतक ठोकले अन् संघाला ३४४ धावांपर्यंत पोहोचवले. पण, अब्दुल्ला शफीक आणि मोहम्मद रिझवान यांच्या शतकांच्या जोरावर पाकिस्तानने आतापर्यंतच्या सर्वोच्च धावसंख्येचा पाठलाग करून विक्रम रचला.
लखनौमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध श्रीलंकेला जिंकणे आवश्यक होते, या सामन्यात सलामीवीर पथुम निसांका आणि कुसल परेरा यांनी त्यांच्या संघाला चांगली सुरुवात करून दिली. या जोडीने २१ षटकांत १२५ धावा जोडल्या. पण, त्यांचा संपूर्ण संघ २०९ धावांत तंबूत परतला. मिचेल मार्श आणि जोश इंग्लिस यांनी अर्धशतके झळकावून ऑस्ट्रेलियाला ५ विकेट्सने राखून विजय मिळवून दिला. हा पराभव त्यांची डोकेदुखी वाढवणारा ठरला आहे आणि त्यांनी सलग तीन सामने गमावले आहेत. त्यांचा नेट रन रेट -१.५३२ असा वजामध्ये गेला आहे आणि ते तळापासून दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
यंदाच्या स्पर्धेत प्रत्येक संघाला प्रत्येकी ९ सामने खेळायचे आहेत आणि ३ पराभवानंतरही श्रीलंकेला उपांत्य फेरीत जाण्याची संधी आहे. उपांत्य फेरीच्या शर्यतीत जाण्यासाठी प्रत्येक संघाला किमान ६ सामने जिंकणे आवश्यक आहे. ७ विजय अंतिम चारमधील स्थान निश्चित करतील. अंतिम चारमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी श्रीलंकेला त्यांचे उर्वरित सर्व सहा सामने जिंकावे लागतील. श्रीलंकेचा त्यांच्या उर्वरित सामन्यांमध्ये नेदरलँड, इंग्लंड, अफगाणिस्तान, भारत, बांगलादेश आणि न्यूझीलंड यांचा सामना होईल. यापैकी श्रीलंकेला बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्ध जिंकण्याची शक्यता आहे आणि त्यांना नेट रन रेटही सुधारता येईल. इतर तीन सामन्यांमध्ये भारत, इंग्लंड आणि न्यूझीलंड सारख्या आघाडीच्या संघांविरुद्ध खूप चांगले खेळावे लागेल.