भारतीय संघाचा मधल्या फळीतील स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) याच्या फॉर्मची साऱ्याच प्रतिस्पर्धींनी धास्ती घेतलेली पाहायला मिळाली. नवा Mr 360 म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या सूर्यकुमारने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांना धू धू धुतले... त्याच्या ५१ चेंडूंवरील ११२ धावांच्या खेळीने भारताला ट्वेंटी-२० मालिकेत २-१ असा विजय मिळवून दिला. आता तो आणखी एक मोठा पराक्रम नोंदवण्याची शक्यता आहे. आयसीसीच्या जागतिक ट्वेंटी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत सूर्यकुमार यादव नंबर वन आहे... शनिवारी त्याने राजकोट येथे ४५ चेंडूंत ट्वेंटी-२०तील त्याचे तिसरे शतक पूर्ण केले. भारताने हा सामना ९७ धावांनी जिंकला.
सूर्याने ७ चौकार आणि ९ षटकारांसह ११२ धावा केल्या. सूर्याचे हे मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमधील तिसरे शतक होते तर भारतीय मैदानावरील पहिले शतक. जुलै २०२२ इंग्लंडविरुद्ध आणि नोव्हेंबर २०२२ मध्ये न्यूझीलंडविरुद्धचा शतकांसह गेल्या ६ महिन्यांत सूर्याने ३ शतके झळकावली आहेत. सूर्यकुमार यादवने २०२१ मध्ये वयाच्या ३१ व्या वर्षी भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. सूर्याने आतापर्यंत १६ वन डे आणि ४५ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत. सूर्याने या ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ४६.४१ च्या सरासरीने १५७८ धावा केल्या आहेत, ज्यात तीन शतकं आणि १३ अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-२०मध्ये त्याचा स्ट्राईक रेट १८० पेक्षा जास्त आहे.
कालच्या त्याच्या खेळीने सूर्यकुमार आयसीसी ट्वेंटी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत मोठा विक्रम नोंदवू शकतो. आयसीसी ट्वेंटी-२० क्रमवारीत ९००+ रेटिंग पॉईंट कमावणारा तो तिसरा फलंदाज ठरू शकतो. सध्या तो ८८३ पॉईंटसह अव्वल स्थानावर आहे आणि येणाऱ्या आठवड्यात आयसीसी सुधारित क्रमवारी जाहीर करणार आहे. त्यात तो ९०० पॉईंटसच्या वर जाऊ शकतो. ट्वेंटी-२० क्रमवारीच्या इतिहासात इंग्लंडचा डेवीड मलान व ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आरोन फिंच यांनाच ९०० पॉईंट्स कमावता आले आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"