विश्वविक्रमी सलग १५ वा मालिका विजय; श्रीलंकेविरुद्ध दिवस-रात्र कसोटी २३८ धावांनी जिंकली

बुमराहचे आठ बळी, पंत ‘मालिकावीर’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 09:25 AM2022-03-15T09:25:57+5:302022-03-15T09:26:07+5:30

whatsapp join usJoin us
World record 15th consecutive series win; They won the day and night Test against Sri Lanka by 238 runs | विश्वविक्रमी सलग १५ वा मालिका विजय; श्रीलंकेविरुद्ध दिवस-रात्र कसोटी २३८ धावांनी जिंकली

विश्वविक्रमी सलग १५ वा मालिका विजय; श्रीलंकेविरुद्ध दिवस-रात्र कसोटी २३८ धावांनी जिंकली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बंगळुरू : एकतर्फी झालेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात भारताने श्रीलंकेचा २३८ धावांनी धुव्वा उडवला. यासह भारताने दोन कसोटी सामन्यांची मालिका २-० अशी निर्विवादपणे जिंकली. विशेष म्हणजे भारताने मायदेशात सलग १५वी कसोटी मालिका जिंकली असून, मायदेशात असे वर्चस्व कोणत्याही संघाला राखता आलेले नाही. तसेच, पहिला सामना तीन दिवसांत जिंकलेल्या भारताने दुसरा सामनाही तिसऱ्याच दिवशी जिंकत लंकेच्या आव्हानातली हवाच काढली. यष्टिरक्षक- फलंदाज ऋषभ पंत हा मालिकेचा मानकरी ठरला.

फिरकी आणि उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवर भारतीय मारा खेळणे लंकेला अत्यंत कठीण गेले. दुसऱ्या कसोटीत दोन्ही डावांत अर्धशतकी खेळी करून मोलाची कामगिरी केलेला श्रेयस अय्यर सामनावीर ठरला. तसेच, मालिकेत सर्वाधिक १८५ धावा काढून यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत मालिकावीर ठरला. भारताने पहिल्या डावात २५२ धावा केल्यानंतर लंकेला १०९ धावांत गुंडाळत १४३ धावांची आघाडी घेतली. यानंतर भारताने दुसरा डाव ९ बाद ३०३ धावांवर घोषित करत लंकेला ४४७ धावांचे भलेमोठे आव्हान दिले. या महाकाय लक्ष्याचा पाठलाग करताना लंकेची २०८ धावांमध्ये दाणादाण उडाली.

या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना लंकेने तिसऱ्या दिवशी १ बाद २८ धावांवरून सुरुवात केली. मात्र, जसप्रीत बुमराह (३/२३) आणि रविचंद्रन अश्विन (४/५५) यांच्यापुढे लंकेच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. कर्णधार दिमुथ करुणारत्नेने शानदार झुंज देताना १७४ चेंडूंत १५ चौकारांसह १०७ धावांची खेळी केली. करुणारत्नेने १४वे कसोटी झळकावले. त्याला उपयुक्त साथ दिलेल्या कुसल मेंडिसने ६० चेंडूंत ८ चौकारांसह ५४ धावा कुटल्या. दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी ९७ धावांची भागीदारी करत संघाच्या डावाला आकार देण्याचा चांगला प्रयत्न केला. मात्र, अश्विनने मेंडिसला यष्टिचीत करत ही जोडी फोडली आणि येथून लंकेच्या फलंदाजीला गळती लागली.

मेंडिस बाद झाल्यानंतर करुणारत्नेने एक बाजू लावून धरली; परंतु त्याला इतर फलंदाजांकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. करुणारत्ने-मेंडिस यांचा अपवाद वगळता कोणाला भारतीय माऱ्याचा खंबीरपणे सामना करता आला नाही. लंकेने १११ धावांमध्ये ९ बळी गमावल्याने त्यांचा डाव १ बाद ७९ धावांवरून २०८ धावांवर संपुष्टात आला. करुणारत्ने-मेंडिस यांच्याव्यतिरिक्त केवळ निरोशन डिकवेला (१२) दुहेरी धावसंख्या गाठू शकला. फिरकीपटू अक्षर पटेलने २, तर रवींद्र जडेजाने एक बळी घेत बुमराह-अश्विन यांना चांगली साथ दिली.

त्रिफळा उडवल्यानंतर लकमलला दिल्या शुभेच्छा

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज सुरंगा लकमल याचा त्रिफळा उडवत जसप्रीत बुमराहने त्याला तंबूची वाट दाखवली. मात्र, बळी मिळवल्यानंतर बुमराहने धावत जाऊन लकमलला मिठी मारली. याचे कारण म्हणजे, लकमलची निवृत्ती. लकमलचा हा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना होता. बुमराहने त्याला शुभेच्छा दिल्यानंतर मयांक अग्रवाल, विराट कोहली, कर्णधार रोहित शर्मा यांनीही लकमलला शुभेच्छा दिल्या. लकमलने ६९ कसोटी सामन्यांतून १७० बळी घेतले असून, त्याने एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांमध्ये अनुक्रमे १०९ आणि ८ बळी घेतले आहेत.

विक्रमवीर अश्विन...
 रविचंद्रन अश्विनने डब्ल्यूटीसी इतिहासामध्ये १०० बळींचा पल्ला गाठला असून, अशी कामगिरी करणारा तो पहिला गोलंदाज ठरला. ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स (९३) दुसऱ्या स्थानी. अश्विनने आज ४४२ बळी पूर्ण करीत डेल स्टेन(४३९) याला मागे  टाकले. अश्विनने ८६ कसोटीत इतके बळी घेतले असून स्टेनने ९३ सामन्यात अशी कामगिरी केली आहे.

भारताने २०२१-२२ मध्ये मायदेशातील सत्राची यशस्वी सांगता करताना एकही पराभव पत्करला नाही. यादरम्यान भारताने ४ कसोटीपैकी ३ सामने जिंकताना एक सामना अनिर्णित राखला. तिन्ही एकदिवसीय सामने जिंकता ९ पैकी ९ टी-२० लढतीही जिंकल्या. श्रीलंकेकडून दिवस-रात्र कसोटीत दोन शतके नोंदवली गेली असून, ही दोन्ही शतके दिमुथ करुणारत्नेने झळकावली आहेत. दिवस-रात्र कसोटीच्या चौथ्या डावात शतक करणारा करुणारत्ने पहिला सलामीवीर आणि पहिला कर्णधार ठरला.

जागतिक कसोटी अजिंक्यपदच्या (डब्ल्यूटीसी) यंदाच्या सत्रात जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ४० बळी घेताना इंग्लंडचा ओली रॉबिन्सन (३२) आणि पाकिस्तानचा शाहिन आफ्रिदी (३१) यांना मागे टाकले. दिवस-रात्र कसोटीत धावांच्याबाबतीत भारताने तिसरा मोठा विजय नोंदवला. पहिले दोन मोठे विजय ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहेत. त्यांनी २०१९ मध्ये न्यूझीलंडचा २९६ धावांनी आणि २०२१ मध्ये इंग्लंडचा २७५ धावांनी पराभव केला होता.

भारताने सलग ११वा आंतरराष्ट्रीय सामना जिंकला.भारताविरुद्ध भारतात खेळताना दिमुथ करुणारत्नेने कर्णधार म्हणून दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम खेळी केली. इंग्लंडच्या जो रुटने २०२१ मध्ये २१८ धावांची खेळी केली आहे.दिवस-रात्र कसोटी सामन्यात सामनावीर ठरणारा श्रेयस अय्यर तिसरा भारतीय ठरला. याआधी इशांत शर्मा व अक्षर पटेल सामनावीर ठरले होते. रोहित शर्माने कर्णधार म्हणून पहिली एकदिवसीय आणि पहिली टी-२० मालिका जिंकल्यानंतर पहिली कसोटी मालिकाही जिंकली. कसोटी मालिकेत मालिकावीर पुरस्कार मिळवणारा ऋषभ पंत पहिला भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज ठरला. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा रविचंद्रन अश्विन आठवा गोलंदाज ठरला. अश्विनने ४४२ बळी घेतले असून त्याने दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेनला (४३९) मागे टाकले. मायदेशात भारताने सलग १५वी कसोटी मालिका जिंकली असून ऑस्ट्रेलियाने १९९४-२००० आणि २००४-२००८ दरम्यान २ वेळा सलग १० कसोटी मालिका जिंकल्या होत्या.

Web Title: World record 15th consecutive series win; They won the day and night Test against Sri Lanka by 238 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.