ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज मिचेल स्टार्कची पत्नी यापलिकडे अॅलिसा हिलीनं महिला क्रिकेटमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. बुधवारी तिनं ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका महिला ट्वेंटी-20 सामन्यात World Record नोंदवला. तिनं महिला ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विक्रम स्वतःच्या नावावर करताना अनेक विक्रम मोडले. विशेष म्हणजे न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅकलमच्या नावावर असलेला विक्रमही अॅलिसानं नावावर केला. केवळ महिला खेळाडूंतच नव्हे, तर पुरुष क्रिकेटपटूंना लाजवेल अशी कामगिरी आज अॅलिसाने केली.
ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात अॅलिसाच्या फटकेबाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं 2 बाद 226 धावांचा डोंगर उभा केला. महिला क्रिकेटमध्ये सलग 72 सामने खेळताना अॅलिसाने दक्षिण आफ्रिकेच्या मिग्नन ड्यू प्रीझचा ( 2009-18) 71 सामन्यांचा विक्रम मोडला. या विक्रमत पाकिस्तानची साना मीर 73 सामन्यांसह आघाडीवर आहे. अॅलिसाने श्रीलंकेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. तिनं 46 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. महिला ट्वेंटी-20 क्रिकेटमधील हे दुसरे जलद अर्धशतक ठरले. वेस्ट इंडिजची डेंड्रा डॉटीननं 38 ( वि. दक्षिण आफ्रिका, 2010) चेंडूंत अर्धशतक झळकावले आहे.
अॅलिसाने या सामन्यात 123 धावांचा पल्ला ओलांडताच न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅकलमचा विक्रम मोडला. महिला व पुरुष क्रिकेटपटूंमध्ये यष्टिरक्षक म्हणून ट्वेंटी-20 सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम अॅलिसाच्या नावावर झाला आहे. मॅकलमने 2012मध्ये बांगलादेशविरुद्ध 123 धावांची खेळी केली होती. अॅलिसाचा हा झंझावात कायम राहिला. तिनं 148 धावांची खेळी करताना विश्वविक्रम नावावर केला. अॅलिसाने 61 चेंडूंत 19 चौकार व 7 षटकार खेचून नाबाद 148 धावा केल्या. यासह तिनं ऑस्ट्रेलियाच्याच मेग लॅनिंगचा 133* धावांचा ( वि. इंग्लंड, 2019) विक्रम मोडला.