भारतात सुरु असलेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत आज भारतीय गोलंदाजांसमोर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानने शरणागती पत्करली २ बाद १५५ वरून पाकिस्तानचा संपूर्ण संघ १९१ धावांत तंबूत परतला. एकीकडे पाकिस्तानची ही अवस्था झाली असताना दुसरीकडे ब्युनोस एरेस येथे अर्जेंटिनाच्या महिला क्रिकेट संघाने विश्वविक्रमी कामगिरी केली. चिली विरुद्धच्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यांत त्यांनी ४२७ धावांचा डोंगर उभा केला. महिला किंवा पुरुष आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यातील ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली. मार्च २०२२ मध्ये बहरिनच्या महिला संघाने सौदी अरेबियाविरुद्ध १ बाद ३१८ धावा केल्या होत्या.
अर्जेंटिनाच्या ओपनर ल्युसिया टेलरने ८४ चेंडूंत २७ चौकारांच्या मदतीने १६९ धावा कुटल्या आणि महिलांच्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. अलबर्टिना गॅलनने ८४ चेंडूंत २३ चौकारांच्या मदतीने नाबाद १४५ धावा केल्या. मारिया कॅस्टीनिरास ४० धावांवर नाबाद राहिली. चिलीचा संघ ६३ धावांत तंबूत पाठवला आणि अर्जेंटिनाने ३६४ धावांनी सामना जिंकला. टेलर आणि गॅलन यांनी ३५० धावांची भागीदारी करून इतिहास रचला. पुरुष किंवा महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही सर्वोच्च भागीदारी ठरली.
चिलीच्या फ्लोरेंसिया मार्टिनेझने १७ नो बॉल टाकले आणि त्यामुळे तिच्या एका षटकात ५२ धावा आल्या. मागील महिन्यात आशियाई क्रीडा स्पर्धेत नेपाळच्या पुरुष संघाने मंगोलियाविरुद्ध ३ बाद ३१४ धावा केल्या होत्या.