ICC Women's T20 World Cup Europe Region : आजपासून सुरू झालेल्या आयसीसी महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप युरोप विभागाच्या पात्रता स्पर्धेत दोन मोठे विक्रम झाले. जर्मनीविरुद्धच्या सामन्यात आयर्लंडच्या गॅबी लेवीसनं शतक झळकावून इतिहास घडवला. आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त शतक झळकावणारी ती पहिलीच महिला खेळाडू ठरली. त्यानंतर नेदरलँड्स विरुद्ध फ्रान्स या सामन्यात वर्ल्ड रिकॉर्डची नोंद झाली. नेदरल्ँड्सच्या फ्रेडरीक ओव्हरडिकनं आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यात मोठा विक्रम केला. तिनं टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज दीपक चहर याचा विक्रम मोडताना जगात कुणालाच न जमणारी कामगिरी करून दाखवली. नेदरलँड्सनं हा सामना ९ विकेट्स व ९९ चेंडू राखून जिंकला.
आश्चर्यच; २० षटकांत संघानं केल्या ३ बाद ३२ धावा; १६४ धावांनी जिंकला प्रतिस्पर्धी संघ!
प्रथम फलंदाजीला आलेल्या फ्रान्सचा संपूर्ण संघ १७.३ षटकांत ३३ धावांवर गारद झाला. फ्रान्सचे चार फलंदाज भोपळ्यावर माघारी परतले, तर इतरांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. नेदरलँड्सनं दिलेल्या १४ अतिरिक्त धावा या फ्रान्सकडून सर्वाधिक धावा ठरल्या. फ्रेडरीकनं ४ पैकी २ षटकं निर्धाव टाकली अन् ३ धावा देत ७ विकेट्स घेतल्या. ट्वेंटी-२०त ७ विकेट्स घेणारी ती पहिली खेळाडू ठरली. एकाही महिला व पुरुष गोलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नव्हती. ( Netherlands' Frederique Overdijk became the first cricketer to scalp seven wickets in a T20I). फ्रान्सचे ३४ धावांचे लक्ष्य नेदरल्ँड्सनं १ विकेट्सच्या मोबदल्यात ३.३ षटकांत पार केले.
फ्रेडरीकनं नेपाळच्या अंजली चंद व दीपक चहरचा विक्रम मोडला. अंजलीनं २०१९मध्ये २.१ षटकांत २ निर्धाव षटकं फेकताना एकही धाव न देता ६ विकेट्स घेतल्या होत्या. त्यापाठोपाठ मॅस एलिसानं ४-१-३-६ अशी आणि दीपक चहरनं ३.२-०-७-६ अशी कामगिरी केली होती.