रायपूर : सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालील इंडिया लीजेंड्सने येथे वेस्ट इंडिज लीजेंड्सचा १३ धावांनी पराभव करत ‘रस्ता सुरक्षा विश्व सिरीज टी-२०’च्या अंतिम फेरीत धडक मारली. अखेरच्या क्षणी दिग्गज ब्रायन लाराने केलेल्या तुफानी हल्ल्याच्या जोरावर एकवेळ विंडीजने विजयी मार्ग पकडला होता. परंतु, गोलंदाजांनी अंतिम क्षणी टिच्चून मारा करत भारताला विजयी केले.
सचिनने आपल्या जुन्या स्टाईलने फटकेबाजी करत ४२ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ६५ धावांची आक्रमक खेळी केली. त्याला जबरदस्त साथ दिलेल्या युवराज सिंगने पुन्हा एकदा षटकारांचा पाऊस पाडला. केवळ एक चौकार आणि तब्बल ६ षटकारांचा दणका देत युवीने केवळ २० चेंडूंत ४९ धावांचा तडाखा दिला. या जोरावर भारताने २० षटकात ३ बाद २१८ धावांचा डोंगर रचला. टीम इंडिया सहज विजय मिळवणार, असे दिसत असताना यजमानांना फटका बसला तो सुमार गोलंदाजीचा. विंडीजने भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवत सामन्यात रंग भरले. त्यांचा डाव ६ बाद २०६ धावांत रोखला गेला खरा, मात्र सामना गाजवला तो ब्रायन लाराने. लाराने सहजासहजी हार न पत्करता जबरदस्त हल्ला चढवला. त्याला रोखताना भारतीयांवरील दडपण स्पष्ट दिसले. मात्र, विनयकुमारने त्याचा बहुमूल्य बळी मिळवला.
वेस्ट इंडिज लीजेंड्स
लाराने २८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४८ धावा कुटताना भारतीयांना प्रचंड दबावाखाली आणले.
वेगवान गोलंदाज आर. विनय कुमारने मोक्याच्या क्षणी १९ व्या षटकात ब्रायन लारासह टिनो बेस्ट यांना बाद करत इंडिया लीजेंड्सला वर्चस्व मिळवून दिले. लारा बाद झाला तेव्हा विंडीजला ९ चेंडूंत १९ धावांची गरज होती.
ड्वेन स्मिथ (६३ धावा, ३६ चेंडू, ९ चौकार, २ षटकार) आणि नरसिंग देवनारायण (५९ धावा, ४४ चेंडू, ५ चौकार, २ षटकार) यांनीही सुरुवातीला चौफेर फटकेबाजी करत टीम इंडियावर दडपण आणले होते.
इंडिया लीजेंड्स
प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर इंडियन लीजेंड्सने सलग दुसऱ्या लढतीत २००पेक्षा अधिक धावसंख्या केली. सचिन-युवी यांच्याव्यतिरिक्त वीरेंद्र सेहवागनेही फटकेबाजी केली. त्याने १७ चेंडूंत् ५ चौकार व एका षटकारासह ३५ धावा कुटताना सचिनसह ३३ चेंडूंत ५३ धावांची सलामी दिली.
युसूफ पठाण (३७) व मोहम्मद कैफ (२७) यांचेही योगदान उल्लेखनीय ठरले. मात्र, भारताला दोनशेपलिकडे नेले ते युवराजने. अखेरच्या दोन षटकात सहा षटकार ठोकत युवीने विंडीजची बेदम पिटाई केली.
१९ व्या षटकात युवराजने महेंद्रा नागामुटूच्या गोलंदाजीवर चार, तर अखेरच्या षटकात सुलेमान बेनच्या गोलंदाजीवर दोन षटकार मारले.
संक्षिप्त धावफलक -
इंडिया लीजेंड्स : २० षटकांत ३ बाद २१८ धावा (सचिन ६५, युवराज नाबाद ४९, युसुफ पठाण नाबाद ३७, टिनो बेस्ट २-२५)
वेस्ट इंडिज लीजेंड्स : २० षटकांत ६ बाद २०६ धावा : (ड्वेन स्मिथ ६३, नरसिंग देवनारायण ५९, ब्रायन लारा ४६;
विनय कुमार २/२६)
Web Title: World Series T20; Lara's stormy shots, but India's victory; Sachin Tendulkar's storm
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.