बंगळुरु पाठोपाठ पुण्याचं मैदान मारत पाहुण्या न्यूझीलंड संघाने भारतात पहिली कसोटी मालिका जिंकून इतिहास रचला. दुसरीकडे भारतीय संघावर २०१२ नंतर पहिल्यांदाच घरच्या मैदानावर मालिका गमावण्याची वेळ आली. भारत-न्यूझीलंड यांच्यातील ३ सामन्यांची कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग आहे. सलग दोन पराभवानंतरही भारतीय संघ WTC 2023-25 Points Table मध्ये अव्वलस्थानी आहे. पण टीम इंडियाची विजयाची टक्केवारी घसली आहे.
टीम इंडिया अजूनही अव्वल, पण...
भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत सलग तिसरी फायनल खेळण्याच्या शर्यतीत आघाडीवर असला तरी हा मार्ग खडतर होण्याचे संकेत मिळत आहेत. इथं जाणून घेऊयात भारत न्यूझीलंड यांच्यातील पुण्याच्या मैदानातील निकालानंतर WTC च्या गुणतालिकेत कोणता बदल झालाय? भारतीय संघाला स्वबळावर फायनल गाठायची असेल तर त्याचे समीकरण काय असेल? यासंदर्भातील सविस्तर माहिती भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या स्पर्धेत अजूनही अव्वलस्थानी आहे. टीम इंडियाच्या विजयाची टक्केवारी ६२.८२ इतकी आहे. दुसरीकडे न्यूझीलंडचा संघाच्या विजयी टक्केवारीचा आकडा ५० वर पोहचला असून ते गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहेत.
अ.क्र. | संघ | सामने | विजय | पराभव | अनिर्णित | गुण | विजयाची टक्केवारी |
१ | भारत | १३ | ८ | ४ | १ | ९८ | ६२.८२ |
२ | ऑस्ट्रेलिया | १२ | ८ | ३ | १ | ९० | ६२.५ |
३ | श्रीलंका | ९ | ५ | ४ | ० | ६० | ५५.५६ |
४ | न्यूझीलंड | १० | ५ | ५ | ० | ६० | ५०.०० |
५ | दक्षिण आफ्रिका | ७ | ७ | ३ | १ | ४० | ४७.६२ |
६ | इंग्लंड | १८ | ९ | ८ | १ | ९३ | ४३.०६ |
७ | पाकिस्तान | १० | ४ | ६ | ० | ४० | ३३.३३ |
८ | बांगलादेश | ९ | ३ | ६ | ० | ३३ | ३०.५६ |
९ | वेस्ट इंडिज | ९ | १ | ६ | २ | २० | १८.५२ |
काय असेल टीम इंडियासाठी फायनलचं तिकीट पक्कं करण्याचं समीकरण?
न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेआधी भारतीय संघाची विजयी टक्केवारीचा आकडा हा ७० पेक्षा अधिक होता. पण सलग पराभवानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या अगदी जवळपास पोहचला आहे. यंदाच्या हंगामातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत आता भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतील मुंबईतील अखेरच्या कसोटी सामन्यासह ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या ६ पैकी किमान ४ सामने जिंकले तरच भारतीय संघ स्वबळावर फायनलमध्ये पोहचू शकेल. याचा अर्थ टीम इंडियाला घरच्या मैदानावरील शेवटच्या सामन्यातील विजयासह ऑस्ट्रेलियात दमदार विजय मिळवण्याचे चॅलेंज असेल. हे समीकरण हुकलं तर टीम इंडिया जर तरच्या समीकरणात अडकण्याची भीती आहे.