मेलबोर्न : कोरोनामुळे ऑस्ट्रेलियाने आगामी दक्षिण आफ्रिका दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या दौऱ्यात उभय संघांमध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार होती. पण हा दौरा सध्यातरी रद्द करण्यात आल्याने न्यूझीलंडला त्याचा लाभ झाला असून त्यांना कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (डब्ल्यूटीसी)अंतिम फेरीचे तिकीट मिळाले आहे. १८ ते २२ जून दरम्यान कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे.
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेनुसार सध्या भारत अव्वल स्थानावर असून न्यूझीलंड संघ दुसऱ्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानी तर इंग्लंडचा संघ चौथ्या स्थानी आहे. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याआधी ऑस्ट्रेलियाचा केवळ एकच कसोटी दौरा होता. पण तो दौरा रद्द झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. जून महिन्याआधी क्रिकेटच्या वेळापत्रकानुसार, भारत आणि इंग्लंड कसोटी मालिका खेळणार आहेत. ही कसोटी मालिका एकमेका विरोधातच खेळणार असल्याने न्यूझीलंडला थेट अंतिम फेरीचे तिकीट मिळण्यास मदत झाली आहे.
द. आफ्रिका दौरा रद्द केल्यामुळे ऑस्ट्रेलिया संघ विश्व कसोटी चॅम्पियनशिपमधून जवळपास बाहेर पडला आहे. सीएच्या घोषणेनंतर यंदा जूनमध्ये लॉर्ड्सवर खेळल्या जाणाऱ्या विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये खेळण्याच्या अपेक्षा भंगल्या. गुणतालिकेत अव्वल दोन स्थानांवर राहणारे संघ अंतिम सामना खेळतील. भारत आणि न्यूझीलंड संघ प्रथम आणि द्वितीय स्थानी असून ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर आहे.डब्ल्यूटीसी फायनल खेळण्यासाठी त्यांना द. आफ्रिकेवर २-० ने विजय मिळविणे क्रमप्राप्त होते. भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू होणाऱ्या चार सामन्यांच्या मालिकेतील किमान दोन कसोटी सामने अनिर्णीत राहिल्यास ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरी गाठण्याची संधी मिळू शकते. आरोग्य आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत हा दौरा स्थगित केल्याची माहिती सीएने दिली आहे.
याआधी इंग्लंडने देखील द. आफ्रिका दौऱ्याच्या मध्येच हॉटेलमध्ये एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे दौरा सोडून दिला होता. ऑस्ट्रेलियानेदेखील मागच्या वर्षी बांगलादेश दौरा कोरोनामुळे स्थगित केला होता.
न्यूझीलंडविरुद्ध अंतिम फेरीत कोण?
भारत आणि इंग्लंड यांच्यात चार कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. डब्ल्ययूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचायचे असल्यास आगामी कसोटी मालिकेत भारतीय संघाला किमान दोन सामने जिंकणे गरजेचे हे. शिवाय इंग्लंडला एकापेक्षा जास्त कसोटी सामने जिंकण्यापासून रोखायचे आहे. या मालिकेचा निकाल ४-०, ३-०, ३-१, २-०, २-१ यापैकी काहीही आला तरी भारताचे अंतिम फेरीचे तिकीट पक्के होईल. पण मालिकेचा निकाल इंग्लंडच्या बाजूने ४-०, ३-०, ३-१ यापैकी काहीही लागला तरी इंग्लंडसाठी अंतिम फेरीचे दरवाजे उघडतील.
Web Title: World Test Championship: Fans focus on India-England series
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.