World Test Championship standings - इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये भारतीय खेळाडू चौकार-षटकारांची आतषबाजी करत आहेत, तर दुसरीकडे श्रीलंकेने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत मोठी झेप घेतली आहे. श्रीलंकेने दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशवर १९२ धावांनी विजय मिळवून WTC च्या गुणतिलेकत पाकिस्तानला मागे टाकले. श्रीलंकेने दुसऱ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी खालेद अहमदची विकेट घेऊन मालिका २-० अशी खिशात घातली.
श्रीलंकेने ही कसोटी मालिका जिंकून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत ५० टक्क्यांसह चौथ्या क्रमांकावर झेप घेतली. भारत ( ६८.५१), ऑस्ट्रेलिया ( ६२.५०) आणि न्यूझीलंड ( ५०.००) हे अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. WTC च्या सायकलमध्ये श्रीलंकेला घरच्या मैदानावर आणखी दो कसोटी मालिका खेळायच्या आहेत. या वर्षाच्या शेवटी न्यूझीलंड आणि २०२५च्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया प्रत्येकी २ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर येणार आहेत.
ऑगस्टमध्ये श्रीलंका ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहेत. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत कमिंदू मेंडिसने १२२.३३ च्या सरासरीने सर्वाधिक ३६७ धावा केल्या. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात मेंडिसने नाबाद ९२ धावा केल्या आणि श्रीलंकेने ५३१ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात बांगलादेशचा पहिला डाव १७८ धावांवर गुंडाळला. जलदगती गोलंदाज असिथा फर्नांडोने चार विकेट्स घेतल्या. दुसऱ्या डावात लहिरू कुमाराने चार विकेट्स घेत श्रीलंकेचा विजय पक्का केला.
बांगलादेशचा संघ सातव्या क्रमांकावर घसरला आहे, तर पाकिस्तान, वेस्ट इंडिज व दक्षिण आफ्रिका त्यांच्या पुढे आहेत.