सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मासह बहुतांश खेळाडू हे वेगवेगळ्या संघांकडून खेळत आहेत. मात्र असं असलं तरी टीम इंडियाचं लक्ष आयपीएल आटोपल्यावर होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याकडे आहे. हा सामना ७ जूनपासून खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ७ जूनपासून खेळवण्यात येणार आहे. हा सामना इंग्लंडमध्ये होणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. या सामन्यात रोहित शर्माच भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तसेच या सामन्यासाठी अनेक खेळाडूंची भारतीय संघामधील निवडही निश्चित आहे. तर काही खेळाडूंमध्ये संघात स्थान मिळवण्यासाठी चुरस आहे.
दरम्यान, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघाच्या उपकर्णधाराबाबत मोठा बदल दिसून येण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात आटोपलेल्या बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी के. एल. राहुलकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आलं होतं. मात्र तो फलंदाज म्हणून अपयशी ठरल्यानंतर त्याची उपकर्णधारपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. तसेच त्याच्या जागी चेतेश्वर पुजाराला उपकर्णधार बनवण्यात आलं होतं. आता पुजाराची नियमित उपकर्णधार म्हणून नियुक्ती होणे निश्चित मानले जात आहे.
बीसीसीआयमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पुजारबाबत अपडेट दिली आहे. त्यांनी सांगितले की, पुजारा भारतीय संघाचा उपकर्णधार असेल. तो पुढेही कसोटी क्रिकेटमध्ये उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळेल. सध्या भारतीय क्रिकेट संघाला श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत एक बॅकअप मिडल ऑर्डर फलंदाजाची गरज आहे. मात्र या जागेसाठी अजिंक्य रहाणे शर्यतीत नसल्याचीही माहिती समोर येत आहे.
Web Title: World Test Champioship Final 2023: The vice-captain of Team India, who will change for the final match of the WTC, will hand over the responsibility to this player
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.