नवी दिल्ली : कोरोना विषाणूमुळे क्रिकेटविश्वातील सर्वच स्पर्धा थांबल्या असून, जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेलाही ब्रेक लागला आहे. यासाठीच या स्पर्धेतील उर्वरित सामने पूर्ण करण्यासाठी ही स्पर्धा चार महिने पुढे ढकलण्यासह स्पर्धेच्या कार्यक्रमांमध्ये बदल करण्याबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) विचार करत आहे. मात्र यामुळे अव्वल स्थानावरील भारताच्या वर्चस्वाला कोणताही धक्का बसणार नसून, यापुढेही टीम इंडिया आपले अग्रस्थान कायम राखण्यात यश मिळवेल.
जागतिक कसोटी स्पर्धेत भारताने आतापर्यंत सर्वाधिक चार मालिका खेळल्या असून, यापैकी तीन मालिका भारताने जिंकल्या आहेत. या जोरावर सर्वाधिक ३६० गुणांसह भारताने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. आॅस्टेÑलिया तीन मालिकांमधून २९६ गुणांसह दुसऱ्या स्थानी असून, न्यूझीलंड तीन मालिकांमधून १८० गुणांसह तिसºया स्थानी आहे. इंग्लंड (१४६) आणि पाकिस्तान (१४०) अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानी आहेत. यानंतर श्रीलंका (८०) आणि दक्षिण आफ्रिका (२४) यांचा क्रमांक असून, वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांनी या स्पर्धेंतर्गत अद्याप केवळ एक मालिका खेळली असून, त्यांनी गुणांचे खाते उघडलेले नाही.
आयसीसीच्या नियमानुसार या स्पर्धेंतर्गत प्रत्येक संघाला सहा मालिका (तीन घरच्या मैदानावर, तीन विदेशात) खेळाव्या लागतील. यानुसार भारताने विदेशात आणि मायदेशात प्रत्येकी दोन मालिका खेळल्या आहेत. या सर्व मालिका दोन किंवा तीन कसोटी सामन्यांच्या होत्या आणि विजयाच्या जोरावर भारताने पूर्ण गुण मिळवले आहेत.
या जागतिक स्पर्धेत भारताने आपली पहिली मालिका वेस्ट इंडिजविरुद्ध खेळली आणि या दोन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही सामने जिंकून १२० गुण मिळवले. यानंतर भारताने दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानावर तीन सामन्यांच्या मालिकेत नमवत १२० गुण मिळवले आणि त्यानंतर बांगलादेशलाही घरच्या मैदानावर दोन्ही सामन्यांत नमवले. यासह भारताने ३६० गुणांची कमाई करत अव्वल स्थान पटकावले. त्याच वेळी या वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंड दौºयात मात्र भारताला पराभवाचे तोंड पाहावे लागले. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला एकही सामना जिंकता आला नव्हता. (वृत्तसंस्था)
>अशी आहे स्पर्धेची मांडणी
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील प्रत्येक मालिकेमधून जास्तीत जास्त १२० गुण मिळवता येतात. दोन सामन्यांच्या मालिकेत प्रत्येक सामन्यातून ६० गुण आणि तीन सामन्यांच्या मालिकेत प्रत्येक सामन्यातून ४० गुण मिळवता येतात. यानुसार चार आणि पाच सामन्यांच्या मालिकेत प्रत्येक सामन्यातून अनुक्रमे ३० आणि २४ गुण मिळवता येतात. सामना टाय झाल्यास दोन्ही संघांना समान गुण बहाल करण्यात येतात, तसेच सामना अनिर्णीत राहिल्यानंतर दोन ते पाच सामन्यांच्या मालिकेत अनुक्रमे २०, १३, १० आणि ८ गुण मिळतात.
आव्हान आॅस्टेÑलिया, इंग्लंडचे
या स्पर्धेंतर्गत भारताला अद्याप दोन मालिका खेळायच्या आहेत. यंदा वर्षअखेरीस भारतीय संघ आॅस्टेÑलिया दौºयावर चार सामन्यांची मालिका खेळेल. या मालिकेत यश मिळवल्यास भारतीय संघ आपल्या अंकांमध्ये मोठी वाढ करू शकतो. तसेच पुढील वर्षी जानेवारी महिन्यात भारतीय संघ मायदेशामध्ये इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. इंग्लंडसाठी भारत दौरा सोपा नसेल. गेल्या वेळी २०१६ साली भारत दौºयावर आलेल्या इंग्लंडला पाच सामन्यांच्या मालिकेत ०-४ असा पराभव पत्करावा लागला होता.
Web Title: World Test title; India's position is strong
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.