ICC Women's World Cup, Australia vs Pakistan : आयसीसी महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यातल्या सामन्यानंतर जे प्रेम व ममत्वाचे चित्र पाहायला मिळाले, त्याचे जगाने कौतुक केले. मैदानावर कट्टर प्रतिस्पर्धी असलेले दोन्ही देशांचे खेळाडू मैदानाबाहेर एका कुटुंबासारखे दिसले. पाकिस्तानची कर्णधार बिस्माह मरूफ ( Captain Bismah Maroof) ही तिच्या सात महिन्यांच्या मुलीला सोबत घेऊन न्यूझीलंडमध्ये दाखल झाली आहे. India vs Pakistan लढतीनंतर भारतीय खेळाडू मरूफची कन्या फातिमा ( Fatima) हिच्यासोबत खेळताना दिसले. आज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात मरूफने अर्धशतकी खेळी करून मुलीसाठी खास सेलिब्रेशन केलं आणि तो व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.
आई झाल्यानंतर सात महिन्यांतच मरूफने क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केले आणि आज ती तिचा दुसरा सामना खेळतेय. २८ नोव्हेंबर २०१८मध्ये मरूफने अबरार अहमद याच्याशी विवाह केला. अबरार हा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे . मरूफला सुरुवातीला क्रिकेटपटू नव्हे तर डॉक्टर बनायचे होते, पण कुटुंबीयांच्या सांगण्यावरून ती क्रिकेटपटू झाली. ३० वर्षीय मरूफ ही अष्टपैलू आहे. मागच्या वर्षी ३० ऑगस्टला तिच्या मुलीचा जन्म झाला आणि काही काळ ती क्रिकेटपासून दूर होती.