मोहाली: मोहालीच्या मैदानावर श्रीलंकेविरूद्धच्या दुस-या वनडे सामन्यात कर्णधार रोहित शर्माने कारकिर्दीतील तब्बल तिसरं द्विशतक झळकावण्याचा पराक्रम केला. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात तीन द्विशतक झळकावणारा तो पहिलाच फलंदाज बनला. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत संघाची धुरा सांभाळणा-या रोहितने कर्णधाराला साजेशी अशी खेळी करत श्रीलंकेच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली. 153 चेंडूंमध्ये केलेल्या 208 धावांच्या धमाकेदार खेळीत त्याने मैदानाच्या चहुबाजूंनी फटकेबाजी केली. या खेळीत रोहितने 13 चौकार 12 षटकारांची आतिषबाजी केली. रोहित शर्माने पहिल्या शंभर धावा 115 चेंडूत तर नंतरच्या शंभर धावा अवघ्या 36 चेंडूत पूर्ण केल्या. रोहितच्या या धमाकेदार खेळीमुळे भारताने लंकेविरोधात 392 धावांचा डोंगर उभारला आहे.
2013 मध्ये रोहित शर्माने कांगारुंविरुद्ध कारकिर्दीतील पहिलं द्विशतक झळकावलं होतं. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 209 धावांची खेळी साकारली होती. 13 नोव्हेंबर 2014 या दिवशी सलामीवीर रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध धमाकेदार खेळी केली होती. रोहित शर्माने 264 धावा करत वनडेतील दुसरे द्विशतक झळकावले होते. श्रीलंकेविरुद्धची ही खेळी रोहितच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वोच्च खेळी आहे.
यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 2010 मध्ये वनडेतील पहिलं वहिलं द्विशतक झळकावले, त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद 200 धावांची खेळी केली होती. वेस्ट इंडिजचा धमाकेदार फलंदाज ख्रिस गेलने झिम्बाब्वेविरुद्ध 215 धावांची खेळी केली असून, न्यूझीलंडच्या मार्टिन गप्तिलने वेस्ट इंडिजविरुद्ध 237 धावांची नाबाद खेळी करत द्विशतक ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवले होते. भारताचा धमाकेदार फलंदाज वीरेंद्र सेहवागने वेस्ट इंडिजविरुद्ध 219 धावांची तुफानी खेळी केली होती.
पहिल्या वनडेमध्ये भारताला भारी पडलेल्या लकमल, प्रदीपच्या गोलंदाजीचा रोहित शर्माने अक्षरक्ष पालापाचोळा केला. फर्नाडोच्या 10 षटकात भारताने 106 धावा वसूल केल्या तर लकमलच्या 8 षटकात 71 धावा चोपून काढल्या. अखेरच्या काही षटकांमध्ये प्रत्यक्ष स्टेडियमवर उपस्थित असलेल्यांना आणि सामना पाहणा-यांना भारताच्या स्कोरपेक्षा रोहितच्या डबल सेंच्युरीची जास्त चिंता लागली होती.
संघाचा स्कोर किती होतोय यापेक्षा रोहित द्विशतक फटकावतोय का ? याकडेच सगळयांचे लक्ष्य लागले होते. रोहितचे द्विशतक होताच सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. श्रेयस अय्यरनेही जोरदार फटकेबाजी करत रोहित शर्माबरोबर दुस-या विकेटसाठी 213 धावांची भागीदारी केली. श्रेयस अय्यरने (88) धावा तडकावल्या. त्यापूर्वी सलामीवीर शिखर धवननेही अर्धशतकी खेळी केली. शिखरने 67 चेंडूत (68) धावा तडकावताना 9 चौकार ठोकले. त्याला पाथीरानाने थिरीमानेकरवी झेलबाद केले. रोहित आणि शिखरने पहिल्या विकेटसाठी 115 धावांची भागीदारी केली. पहिल्या वनडेत भारताचा डाव अवघ्या 112 धावात संपुष्टात आला होता. त्या लाजिरवाण्या पराभवाचा भारताने आज पुरेपूर वचपा काढला.