एक गंमत किंवा आवड म्हणून विश्लेषण करायचे ठरवले तर काही दिग्गजांच्या विशिष्ट गुणांचे मिश्रण विराट कोहलीच्या व्यक्तिमत्वात आढळते.
जावेद मियाँदाद - जिगर, व्हिव्हियन रिचर्ड्स - धडाकेबाज फलंदाजी आणि प्रतिस्पर्धी संघावर अॅबसोल्यूट दहशत, सौरव गांगुली -अॅटिट्यूड आणि अॅडम गिलख्रिस्ट -सातत्य. क्रिकेटमध्ये सहसा न शोभणारा शीघ्रकोपी स्वभावही बहुतेक त्याच्यात असावा असे दिसते. पण सध्या तो मैदानावर पुर्वीसारखा एग्रेसिव्ह दिसत नाही. त्यांनं स्वता:वर नियंत्रण केलं आहे. असे म्हणायला हरकरत नाही. विरोधी संघातील खेळाडूनं सध्या स्लेजिंग केलं तर विराट त्याला आपल्या कामगिरीतून उत्तर देताना दिसतोय. पण एकूण कॅरॅक्टर म्हंटले तर आपल्यासारख्या कधीही कुठेही नांगी टाकणार्या संघाच्या स्पिरिटसाठी अत्यावश्यकच आहे.
कोहलीची सध्याची 50.53 ची सरासरी त्याच्या कौशल्याची साक्ष पटवते. पण कर्णधार बनल्यानंतरच्या 38 डावांमध्ये कोहलीची सरासरी आहे 65.50! आजवर कर्णधार म्हणून त्याच्यापेक्षा अधिक चांगली फलंदाजी साक्षात डॉन ब्रॅडमन (100.51) यांनाच देता आली आहे. म्हणजे नेतृत्व स्वीकारल्यानंतर कोहलीची धावांची आणि जिंकण्याची भूक वाढतेच आहे. सध्या भारतीय संघ वन-डेत दुसऱ्या आणि कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे! विराट कोहलीच्या नेतृत्वाचे हे पर्व अधिक प्रदीर्घ आणि यशस्वी ठरण्याची दाट शक्यता आहे. नव्हे, तसा विश्वास कोहलीलाच वाटू लागला आहे! त्यामुळेच मला असे वाटतेय...विराट कोहली जागतिक आणि आधुनिक क्रिकेटचा नवा डॉन (ब्रॅडमन) आहे.
क्रिकेटमधील विराट कोहलीचे सातत्य कौतुकास्पद आहे. त्याच्यातील सातत्य आणि संघाच्या विजयास कारणीभूत होण्याची वारंवारता या निकषांनुसार तो भारताचाच नाही तर जगातील 'ऑल टाईम्स ग्रेट' फलंदाज बनत आहे. ही प्रक्रिया सध्या चालू आहे, त्याने फिटनेस राखून संघातील स्थान अजुन अनेक वर्षे अबाधित ठेवले तर ती प्रक्रिया पूर्ण होईल. सांख्यिकी माहितीनुसार तेंडुलकर वय वर्षे 28 व विराट कोहली वय वर्षे 28 ही तुलना केली तर विराटच्या धावांचे, सरासरीचे, शतकांचे, सातत्याचे व विजयास कारणीभूत ठरण्याचे टेबल अधिक दिमाखात झळकत आहे. याशिवाय तीन गुण प्रखरपणे दिसतात ते जिगरबाज खेळ, धावसंख्येचा पाठलाग करण्यातील सातत्य व भरवश्यास पात्र ठरणे! (एकप्रकारे हे सगळे एकाच गुणाचे तीन कोन आहेत असेही म्हणता येईल).
विराट कोहली हा सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, अनिल कुंबळे किंवा महेंद्रसिंग धोनी यांसारख्या ‘जंटलमन’ भारतीय आयकॉन्सचा ‘आल्टर इगो’ ठरतो. त्याचा स्वभाव बराचसा सौरव गांगुलीच्या स्वभावाशी साधर्म्य सांगतो. सौरव उत्तम कर्णधार तर होताच, पण त्याचा क्रिकेटमधील वैयक्तिक रेकॉर्ड अभूतपूर्व, अद्भुत वगैरे कधीच नव्हता. त्याची फलंदाजीची शैली सुरेख होती. पण तंत्रात, कौशल्यात अनेक मर्यादा होत्या. विराट कोहली मात्र निव्वळ उत्तम नेतृत्वामध्ये समाधान मानणाऱ्यांतला नाही. त्याला उत्तम फलंदाजही व्हायचे असते. त्या दिशेने त्याचे अथक प्रयत्न सुरूच असतात. हाती घेतलेले काम पूर्ण करायचे असते. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये लक्ष्याचा पाठलाग करत असताना शेवटपर्यंत म्हणजे अर्थातच लक्ष्य गाठेपर्यंत त्याला क्रीझवर राहायचे असते. कसोटी सामन्यांमध्ये अनुकूल/प्रतिकूल अशा दोन्ही प्रकारच्या खेळपट्ट्यांवर त्याला शतक बनवायचे असते. शतक बनल्यावर द्विशतक बनवायचे असते. भागीदाऱ्या रचायच्या असतात. समोर तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे की, नवव्या क्रमांकावरील फलंदाज, याने काहीच फरक पडणार नसतो! फलंदाजीचे पॅड्स उतरवल्यानंतर विराट कर्णधारपदाची टोपी चढवतो आणि पूर्णपणे त्या भूमिकेत समरस होतो. तो सौरवइतकाच उत्तम कर्णधार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये नेतृत्व करताना महेंद्रसिंग धोनीपेक्षा कितीतरी अधिक धाडस आणि कल्पकता दाखवतो. प्रत्येक कौशल्य आत्मसात करण्यासाठी प्रचंड ऊर्जा, एकाग्रता, ईर्ष्या, भान, फिटनेस आणि आत्मविश्वास लागतो. कोहलीकडे इतके सगळे गुण ठासून भरले आहेत, हे भारताचे भाग्यच मानावे लागेल.