नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाने कोरोनाचा वाढता प्रकोप असल्याचे कारण देत आगामी द. आफ्रिका दौर रद्द करण्याचा मंगळवारी निर्णय घेतला. क्रिकेटसाठी ही चिंताग्रस्त आणि वेदनादायी बाब असल्याचे मत इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन याने व्यक्त केले. त्याचवेळी वॉनने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला प्रश्न विचारला आहे. ऑस्ट्रेलियाला अशास्थितीत भारत दौऱ्यावर जायचे असते तर त्यांनी भारताचा दौरा रद्द केला असता का, असा वॉनचा खोचक सवाल आहे. त्याच्या मते,‘ कोरोनाचा बहाणा करीत ऑस्ट्रेलियाने द. आफ्रिकेत जाण्यास टाळाटाळ केली.’
वॉनने ट्विट केले, ‘ऑस्ट्रेलियाने द. आफ्रिका दौरा करण्यास नकार देणे ही खेळात चिंता वाढविणारी बाब आहे. भारताचा दौरा असता तर त्यांनी अशी टाळाटाळ केली असती का? अशा कठीण समयी बिग थ्रींनी (भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया) अन्य क्रिकेट बोर्डांना आर्थिक मदत होण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करायला हवे.’ द. आफ्रिका दौऱ्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने संघ जाहीर देखील केला होता, मात्र काल अचानक दौरा रद्द करण्यात आला, हे विशेष.
ऑस्ट्रेलियाने अलीकडे भारतीय संघाच्या दौऱ्यात तीन वन-डे, तीन टी-२० आणि चार कसोटी सामन्यांच्या मालिकेचे यजमानपद भूषविले होते. यजमान संघ वन-डे मालिका जिंकला तर भारताने टी-२० आणि कसोटी मालिकेत यश संपादन केले होते. मंगळवारी अचानक सीएने द. आफ्रिका दौरा कोरोनामुळे रद्द करण्याची घोषणा करताच सीएसएने नाराजी व्यक्त केली होती. सीएसएचे क्रिकेट संचालक ग्रॅमी स्मिथ म्हणाले, ‘सीएचा निर्णय निराशादायी आहे. या निर्णयामुळे आम्ही हताश झालो. अलीकडे सीएची प्रत्येक अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सीएसए प्रयत्नशील होता. ऑस्ट्रेलिया संघ या महिन्याअखेर द. आफ्रिकेत येणार होता, मात्र सर्व तयारी होत असताना त्यांनी आमच्या आशेवर पाणी फेरले आहे.’
द. आफ्रिकेला यजमानपदाची ऑफर दिली होती
मेलबोर्न : द. आफ्रिकेत कोरोनाचा प्रकोप वाढल्यामुळे ऑस्ट्रेलियाने मंगळवारी आगामी तीन सामन्यांच्या मालिकेचा कसोटी दौरा रद्द केला. त्याआधी सर्व पर्याय पुढे ठेवून आम्ही आमच्या देशात ही मालिका खेळविण्याची सीएसएला ऑफर दिली होती, असा खुलासा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केला आहे. दौरा रद्द केल्यानंतर यंदाच्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून ऑस्ट्रेलियाला बाद व्हावे लागले. द. आफ्रिका क्रिकेटने दौरा रद्द झाल्याबद्दल नाराजी व्यक्त करताच सीएचे सीईओ नील हॉकले यांना स्पष्टीकरण द्यावे लागले. ते म्हणाले, ‘आम्ही आमच्या देशात ही मालिका खेळविण्याची ऑफर सीएसएला दिली; मात्र अन्य गोष्टींसह विलगीकरणाच्या मुद्द्यावरून त्यांनी शक्य नसल्याचे सांगितले होते.
माजी स्टार खेळाडू केविन पीटरसन म्हणाला, ‘ऑस्ट्रेलिया संघ भारतासारख्या क्रिकेटमधील बलाढ्य संघाचा दौरा कधीही रद्द करू शकणार नाही. द. आफ्रिका दाैरा रद्द करण्याचा त्यांचा निर्णय क्रिकेटमधील ‘काळा दिवस’ म्हणावा लागेल. इंग्लंडनदेखील आफ्रिका दौरा रद्द करण्यामागे कोरोनाचे कारण दिले. मात्र, श्रीलंकेत खेळाडू पॉझिटिव्ह आढळल्यानंतरही दौरा झालाच. ऑस्ट्रेलियाच्या निर्णयामुळे सीएसएचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.’
Web Title: Would Australia have canceled the India tour then? Former England captain Michael Vaughan's question
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.