IPL 2021 : गतविजेत्या मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) शुक्रवारी पंजाब किंग्सकडून ( Punjab Kings) पराभव पत्करावा लागला. सलग तीन पराभव पत्करलेल्या PBKSनं चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर ९ विकेट्स राखून एकतर्फा विजय मिळवला. MIचा हा पाच सामन्यांतील तिसरा पराभव ठरला. PBKSचा कर्णधार लोकेश राहुलनं नाणेफेक जिंकून MIला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले आणि मुंबईच्या फलंदाजांना पुन्हा अपयश आलेलं पाहायला मिळालं. या सामन्यात रोहित शर्माच्या एका निर्णयावरून दिग्गज क्रिकेटपटूंनी जोरदार टीका केली.
रोहितनं पंजाबविरुद्धच्या सामन्या फॉर्मात असलेल्या सूर्यकुमार यादवला तिसऱ्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले. खराब फॉर्मात असलेल्या इशान किशनला तिसऱ्या क्रमांकावर प्रमोशन दिले. रोहितच्या या निर्णयावर वीरेंद्र सेहवाग व अजय जडेजा यांनी टीका केली. जडेजा म्हणाला,''मागील सामन्यापासून मुंबई इंडियन्सची कामगिरी खराब झालेली आपण, पाहत आहोत. आता तर ते १३० धावांपर्यंत कशीबशी मजल मारत आहेत. मला हे काही समजेनासे झाले आहे. तुम्ही खराब खेळू शकता आणि लवकर आऊट होऊ शकता, परंतु या सामन्यात फलंदाजांमध्ये आक्रमकतेचा अभाव दिसला. ही मुंबई इंडियन्सची ओळख नाही.''
अजय जडेजा पुढे म्हणाला,''पॉवर प्लेमध्ये २-३ विकेट्स गेल्या असत्या तर ही परिस्थिती स्वीकारता आली असती. पण, या सामन्यात असं काहीच नव्हतं. त्यांतर फॉर्मात असलेल्या सूर्यकुमार यादवला खालच्या क्रमांकावर पाठवले. मला हे सांगा की काय वीरेंद्र सेहवागला ओपनिंगएवजी खालच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवणार का?
मुंबई इंडियन्सला सलग दुसऱ्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. पंजाब किंग्सनसं ( Punjab Kings) ९ विकेट्स राखून हा सामना जिंकला अन् गुणतक्त्यात पाचव्या क्रमांकावर झेप घेतली. मुंबई इंडियन्सनं ६ बाद १३१ धावाच केल्या आणि पंजाबनं १७.४ षटकांत १ विकेटच्या मोबदल्यात हे लक्ष्य पार केले. पंजाब किंग्सनं १७.४ षटकांत १ बाद १३२ धावा करून विजय मिळवला. लोकेश राहुल ५२ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ६० धावांवर, तर गेल ३५ चेंडूत ५ चौकार व २ षटकारांसह ४३ धावांवर नाबाद राहिला.