मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ पूर्वी चाहत्यांचा रोष ओढावून घेतला आहे. त्यांनी हार्दिक पांड्याला संघाचा नवा कर्णधार म्हणून जाहीर केले आणि रोहित शर्माच्या चाहत्यांनी हल्लाबोल केला. गुजरात टायटन्समधून पुन्हा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आल्यानंतर हार्दिकला मिळालेली ही जबाबदारी चाहत्यांना आवडली नाही. पण, रोहितचं वय आणि भविष्याचा विचार करता हा निर्णय घेतला गेल्याचे फ्रँचायझीकडून अप्रत्यक्षपणे सांगण्यात आले. रोहितच्या नेतृत्वाखाली फ्रँचायझीने पाच ( २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२०) जेतेपदं नावावर केली आहेत. मुंबई इंडियन्सच्या या निर्णयावर माजी खेळाडू युवराज सिंग ( Yuvraj Singh ) याने असहमती दर्शवली आहे.
''मोठा वाद'', मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर AB de Villiers चं विधान
मुंबई इंडियन्सकडून या निर्णयावर परस्पर विरोधी प्रतिक्रिया उमटल्या; बऱ्याच जणांनी याला भविष्याची वाटचाल म्हणून पाहिले, तर रोहितचे चाहते फ्रँचायझीच्या विरोधात गेले. रोहितची पत्नी, रितिका सजदेह हिने MI प्रशिक्षक मार्क बाऊचर यांच्या मुलाखतीवर इन्स्टाग्राम पोस्टवरून तीव्र प्रतिक्रिया दिली होती. आता, ब्रॉडकास्टर्स स्टार स्पोर्ट्सच्या व्हिडिओमध्ये, भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि रोहितचा माजी MI संघ सहकारी युवराज सिंगने देखील कर्णधार बदलावर एक टिप्पणी केली आहे. हार्दिकला परत आणायचे असले तरी MI ने रोहितला कर्णधार म्हणून कायम ठेवायला हवे होते, असे मत युवराजने व्यक्त केले, त्यामुळे संक्रमणाचा टप्पा सुरळीत झाला असता.
“रोहित शर्मा कर्णधार म्हणून पाच वेळा आयपीएल विजेता आहे. त्याला कर्णधारपदावरून काढून टाकणे हा मोठा निर्णय आहे. माझ्या हातात हा निर्णय असता तर मी रोहितला आणखी एक हंगाम दिला असता आणि हार्दिकला उपकर्णधार बनवले असते आणि संपूर्ण फ्रँचायझी कशी काम करते ते पाहायचे. फ्रँचायझीच्या दृष्टिकोनातून मला समजले आहे की, त्यांनी भविष्याचा विचार करून हा निर्णय घेतला आहे. पण पुन्हा, रोहित अजूनही भारतीय कर्णधार आहे आणि तो खरोखर चांगला खेळत आहे. त्यामुळे हा एक मोठा निर्णय आहे,''असे युवी म्हणाला.
“प्रत्येकाचे मत असते, परंतु फ्रँचायझीने भविष्यासाठी योग्य निर्णय घेतला पाहिजे. मला वाटते की ते हिताचे होते आणि मला आशा आहे की ते चांगले करतील,” असेही युवराज म्हणाला.