Jason Roy smashed 36 ball hundred - इंग्लंडचा संघ पाच ट्वेंटी-२० व तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी वेस्ट इंडिज दौऱ्यावर दाखल झाला आहे. २३ जानेवारीपासून इंग्लंड-वेस्ट इंडिज ( England vs West Indies) यांच्यातल्या ट्वेंटी-२० मालिकेला सुरूवात होत आहे. तत्पूर्वी, England XI vs BCA Pres XI या सामन्यात इंग्लंडचा फलंदाज जेसन रॉय यानं तुफान फटकेबाजी केली. त्यानं ३६ चेंडूंत शतक पूर्ण करताना वेस्ट इंडिजच्या संघाला इशाराच दिला. इंग्लंड एकादश संघानं हा सामना ९४ धावांनी जिंकला.
प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड एकादश संघानं २० षटकांत ४ बाद २३१ धावांचा डोंगर उभा केला. जेसन रॉयनं ४७ चेंडूंत ११५ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत ९ चौकार व १० षटकारांची आतषबाजी होती आणि फक्त चौकार-षटकारांनी त्यानं १९ चेंडूंत ९६ धावा जोडल्या. टॉम बँटन ( ३२), जेम्स व्हिंस ( ४०), कर्णधार इयॉन मॉर्गन ( २२) यांनीही योगदान दिले. प्रत्युत्तरात बार्बाडोस क्रिकेट असोसिएशन अध्यक्षीय एकादश ( BCA Pres XI) संघाचा डाव १३७ धावांवर गडगडला. त्यांच्याकडून शेमर स्पिंगर ( ३६) व शिएन ब्रेथवेट ( २२) यांनी चांगला खेळ केला. इंग्लंडच्या टायमल मिल्सनं सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड दौऱ्याचे वेळापत्रक
ट्वेंटी-२० मालिका२३ जानेवारी - पहिला सामना२४ जानेवारी - दुसरा सामना२७ जानेवारी - तिसरा सामना३० जानेवारी - चौथा सामना३१ जानेवारी - पाचवा सामना
कसोटी मालिका८ ते १२ मार्च - पहिला सामना१६ ते २० मार्च - दुसरा सामना२४ ते २८ मार्च - तिसरा सामना