नवी दिल्ली - युवा क्रिकेटपटू ऋषभ पंत याने रोहित शर्माचा टी-20 मधील सर्वात वेगवान शतकाचा विक्रम मोडीत काढला आहे. सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत हिमाचल प्रदेशविरुद्ध खेळताना पंत याने 32 चेंडूत शतक फटकावत भारतीय क्रिकेटमध्ये नव्या विक्रमाची नोंद केली. गेल्या महिन्यात इंदूर येथे श्रीलंकेविरुद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात रोहित शर्माने 35 चेंडूत शतकी खेळी केली होती.
या खेळीदरम्यान ऋषभ पंतने 38 चेंडूत 8 चौकार आणि 12 षटकारांसह नाबाद 116 धावा फटकावल्या. फिरोजशाह कोटला मैदानात दिल्ली आणि हिमाचल प्रदेश यांच्यात झालेल्या लढतीत हिमाचल प्रदेशने प्रथम फलंदाजी करत दिल्लीसमोर 145 धावांचे आव्हान ठेवले. पण ऋषभ पंतने केलेल्या वादळी खेळीसमोर हे आव्हान अगदी किरकोळ ठरले. ऋषभने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत हिमाचल प्रदेशच्या गोलंदाजांना फोडून काढले. ऋषभच्या या खेळीच्या जोरावर दिल्लीने हा सामना दहा गडी राखून जिंकला.
याआधी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या टी-20 क्रिकेट सामन्यात रोहित शर्माने 35 चेंडूत शतकी खेळी करत भारतातर्फे सर्वात वेगवान टी-20 शतकाचा विक्रम नोंदवला होता. त्याआधी युसूफ पठाणने 2010 साली आयपीएलमध्ये 37 चेंडूत शतक फटकावले होते.
Web Title: Wow pant Rohit Sharma's record fastest century in Twenty20
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.