भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा ( 176) आणि मयांक अग्रवाल ( 215) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर यजमानांनी मोठी धावसंख्या उभारली. रोहित व मयांक ही जोडी प्रथमच कसोटी एकत्र सलामीला मैदानावर उतरली आणि त्यांनी अनेक विक्रमही मोडले. पण, ऑस्ट्रेलियातील 21 वर्षीय सलामीवीराने या दोघांनाही मागे टाकणारी कामगिरी केली. त्यानं सलामीला येताना 345 धावा चोपल्या आणि विशेष म्हणजे त्यात एकही षटकाराचा समावेश नाही.
ब्रुस स्ट्रीट असे या खेळाडूचे नाव आहे आणि ऑस्ट्रेलियातील स्थानिक क्रिकेट स्पर्धेत क्विन्सलँड संघाचे प्रतिनिधित्व करताना त्यानं हा इतिहास घडवला. त्याचे हे 19 सामन्यातील पहिलेच शतक ठरले. 21 वर्षीय स्ट्रीटच्या फटकेबाजीनं क्विन्सलँडनं व्हिक्टोरीया संघावर एक डाव व 105 धावांनी विजय मिळवला. स्ट्रीटनं साडेआठ तासांत 430 चेंडूंचा सामना करताना ही मोठी धावसंख्या उभारली. त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर क्विन्सलँडने 4 बाद 645 धावा केल्या. व्हिक्टोरीयानं पहिल्या डावात 190 आणि दुसऱ्या डावात 350 धावा केल्या. व्हिक्टोरीयाला पहिल्या डावात सी. गॅनोन ( 4/46) आणि एम स्वेप्सन ( 4/61) यांनी, तर दुसऱ्या डावात स्वेप्सन ( 5/107) यांनी धक्के दिले.
स्ट्रीटनं तिसऱ्या विकेटसाठी चार्ली हेम्परीसोबत 412 धावांची भागीदारी केली. चार्लीनं 152 धावा केल्या. या स्पर्धेतील ही आतापर्यंतची सर्वोत्तम भागीदारी समजली जाते. स्ट्रीटने पहिल्या 45 चेंडूंत केवळ तीनच धावा केल्या होत्या, परंतु त्यानंतर त्यानं 385 चेंडूंत 342 धावा केल्या. डावखुऱ्या फलंदाजाने 45 चौकार ठोकले.
ऑस्ट्रेलियातील स्थानिक स्पर्धेतील सर्वोत्तम खेळी 345 - बी स्ट्रीट (2019/20)300* - डीपी ह्युजेस (2015/16)276 - बीजे रोहरर (2014/15)260 - एमजे कोस्ग्रोव्ह (2003/04)239 - बीपी व्हॅन डेनिसन (2001/02)233* - सीजे डॅव्हिस (2001/02)233 - एलआर मॅश (2005/06)232* - सीए फिलिप्सन (2005/06)231* - एडब्लू ओ'ब्रायन (2005/06)230* - एलए कार्सेल्डीन (2001/02)230* - टीजे डीन (2017/18)