Mumbai Indians vs Delhi Capitals, WPL 2023: महिला प्रीमियर लीग (WPL 2023) मध्ये सलग पाच जिंकून धमाकेदार सुरुवात करणाऱ्या मुंबई इंडियन्सची गाडी अचानक रूळावरून घसरू लागली आहे. प्ले-ऑफमध्ये पात्र ठरल्यानंतर, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाला स्पर्धेत सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. दिल्लीकरांनी आजच्या सामन्यात मुंबईला चारीमुंड्या चीत केले. पहिल्या स्थानाच्या शर्यतीत सुरुवातीपासूनच झुंज देत असलेल्या दिल्ली कॅपिटल्सने मुंबईकडून मागील पराभवाचा बदला घेत त्यांचा ९ गडी राखून पराभव केला. दिल्लीने मुंबईला आधी स्वस्तात बाद केले आणि नंतर अवघ्या 9 षटकांत 110 धावांचे लक्ष्य गाठत अव्वल स्थानही काबीज केले.
डी.वाय.पाटील स्टेडियमवर लीगमधील या दोन अव्वल संघांमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात रोमांचक सामना अपेक्षित होता. परंतु मोसमात दुसऱ्यांदा एकतर्फी सामना पाहायला मिळाला. फक्त यावेळी निकाल वेगळा लागला. आधी मुंबईने दिल्लीचा दणदणीत पराभव केला होता, तसाच यावेळी दिल्लीनेही मुंबईला धूळ चारली.
शेफाली, एलिसने मुंबईला दिला दणका
मुंबईला अवघ्या 109 धावांत रोखल्यानंतर दिल्लीने स्फोटक फलंदाजीच्या जोरावर सोपे लक्ष्य झटपट पार केले. दिल्लीने तुफानी फलंदाजी करत पहिले स्थानही मिळवले. दिल्लीची स्फोटक सलामी जोडी, कर्णधार मेग लॅनिंग आणि शेफाली वर्मा यांनी धमाकेदार सुरुवात केली. शेफालीने वादळी खेळी केली. भारताच्या युवा सलामीवीराने अवघ्या 15 चेंडूत 33 धावा (6 चौकार, 1 षटकार) ठोकल्या. पाचव्या षटकात शेफालीची विकेट पडली, तेव्हा धावसंख्या 53 होती. त्यानंतर एलिस कॅप्सीने डाव पुढे नेला. तिने एकाच षटकात 3 षटकार मारले आणि 17 चेंडूत नाबाद 38 धावा (1 चौकार, 5 षटकार) ठोकून संघाला 9 षटकांत विजय मिळवून दिला. कर्णधार लॅनिंगने 32 धावा (22 चेंडू, 4 चौकार, 1 षटकार) केल्या आणि नाबाद राहिली.
मारिजन कॅपच्या गोलंदाजीपुढे मुंबई फेल
दिल्लीची स्टार दक्षिण आफ्रिकेची अष्टपैलू खेळाडू मारिजन कॅपने (2/13) पॉवरप्लेमध्येच मुंबईला धक्के दिले. स्पर्धेतील सुरुवातीच्या षटकांमध्ये अप्रतिम कामगिरी करणाऱ्या कॅपने तिसऱ्या षटकात लागोपाठच्या चेंडूंवर यस्तिका भाटिया आणि नताली सिव्हर-ब्रंट यांच्या विकेट घेतल्या. चौथ्या षटकात जेमिमा रॉड्रिग्जने हेली मॅथ्यूजचा झेल घेतला आणि मुंबईने 10 धावांत 3 विकेट गमावल्या. कॅप्टन हरमनप्रीत कौर (23 धावा, 26 चेंडू) देखील काही विशेष करू शकली नाही. मुंबईसाठी फक्त दोन फलंदाज, पूजा वस्त्राकर (26 धावा, 19 चेंडू) आणि अमनजोत कौर (19 धावा, 16 चेंडू) 100 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने फलंदाजी करू शकले. दिल्लीसाठी शिखा पांडे (2/21) आणि जेस जॉन्सन (2/25) यांनीही चांगली कामगिरी केली.