WPL 2023: महिला आयपीएल या वर्षापासून सुरू होणार आहे. या स्पर्धेच्या सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत. या लीगमध्ये अनेक जुने खेळाडूही दिसणार आहेत. भारतीय क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजही या स्पर्धेत दिसणार आहे. मितालीची अदानी समुहाचा संघ गुजरात जायंट्सने मार्गदर्शक आणि सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. महिलांची आयपीएल यंदा मार्चमध्ये खेळवली जाऊ शकते. महिला खेळाडूंमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या मितालीने 23 वर्षांच्या कारकिर्दीनंतर गेल्या वर्षी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. संघाची मार्गदर्शक म्हणून, 40 वर्षीय मिताली महिला क्रिकेटला प्रोत्साहन देईल आणि गुजरातमध्ये तळागाळात खेळाचा विकास करण्यास मदत करेल. अहमदाबाद फ्रँचायझी अलीकडेच लिलावादरम्यान पाच संघांपैकी सर्वात महागडा संघ म्हणून समोर आला आहे. अदानी स्पोर्ट्सलाइनने 1289 कोटी रुपये खर्च केले आहेत.
'हा उत्साह निःसंशयपणे तरुण महिलांना करिअर म्हणून व्यावसायिकपणे क्रिकेटला निवडण्याचा विचार करण्यास प्रोत्साहित करेल, असं मिताली म्हणाली. 'मला विश्वास आहे की कॉर्पोरेट्सच्या उच्च प्रभावातील सहभागामुळे भारताला अधिक वैभव प्राप्त होण्यास मदत होईल. यामुळे महिला खेळाडूंना मोठी संधी मिळणार आहे, असंही मिताली म्हणाली.
मिताली राज ही भारताच्या महिला संघाची माजी कर्णधार राहिली आहे. महिला प्रीमियर लीगची घोषणा झाल्यापासून मिताली राज निवृत्तीचा निर्णय मागे घेईल आणि मैदानात परतेल, अशा चर्चा सुरू होत्या. मितालीने गेल्या वर्षी जूनमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. 23 वर्षांच्या क्रिकेट करिअरमध्ये मितालीने अनेक विक्रम केले. मितालीने महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक एकदिवसीय आणि टी-20 धावा केल्या आहेत. मितालीने भारतासाठी 232 एकदिवसीय सामने खेळले असून, तिने 50.68 च्या सरासरीने 7805 धावा केल्या आहेत. याशिवाय मितालीने 89 टी-20 सामन्यांमध्ये 2364 धावा केल्या आहेत.
IND vs NZ T20: रांचीमध्ये लोक सामना नाही तर फक्त धोनीला पाहायला आले होते - जिमी नीशम
बीसीसीआयच्या नव्या उपक्रमामुळे महिला क्रिकेट बदलणार आहे, असंही मितालीने म्हटले आहे. महिला प्रीमियर लीग हे महिला क्रिकेटसाठी एक उत्तम पाऊल आहे आणि अदानी समूहाच्या सहभागामुळे खेळाला खूप चालना मिळाली आहे, असंही मिताली म्हणाली.