Ashleigh Gardner Laura Wolvaardt, WPL 2023: दिल्ली कॅपिटल्सला महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी आण खी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण गुजरात जायंट्सने एका रोमांचक लढतीत गुरूवारी दिल्ली कॅपिटल्सचा ११ धावांनी पराभव केला. स्पर्धेच्या प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी धडपडणाऱ्या, स्नेह राणाच्या गुजरातने शेवटपर्यंत खिंड लढवली आणि अखेर स्पर्धेतील आपला दुसरा विजय नोंदवला. नुकत्याच झालेल्या महिला टी२० वर्ल्ड कप फायनलमधील ऑस्ट्रेलियाची एशले गार्डनर आणि दक्षिण आफ्रिकेची लॉरा वुलवार्ट यांनी गुजरातला विजय मिळवून दिला. पण गुजरातच्या विजयाची स्टार ठरली विश्वविजेता अष्टपैलू एशले गार्डनर. तिने डब्ल्यूपीएलमध्ये प्रथम फलंदाजी आणि नंतर गोलंदाजी करत सर्वोत्तम कामगिरी केली.
गुरुवारी WPLच्या 14 व्या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करत दिल्लीसमोर 148 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ पूर्ण २० षटकेही खेळू शकला नाही आणि अवघ्या १३६ धावांत आटोपला. दिल्लीचा 6 सामन्यांमधला हा दुसरा पराभव असून तरीही तो पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.
दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्याच षटकात मेरीजन कॅपने सलामीवीर सोफिया डंकलेला पॅव्हेलियनमध्ये परतवून चांगली सुरुवात केली. लॉरा वुलवार्ट आणि हरलीन देओल (31) यांनी 49 धावांची भागीदारी केली. भागीदारी खूपच संथ राहिली आणि 10व्या षटकापर्यंत त्यांच्या 2 बाद 53 धावाच झाल्या. गेल्या महिन्यात T20 विश्वचषकात टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या अशले गार्डनरने WPL मधील तिची सर्वोत्तम खेळी खेळताना केवळ 33 चेंडूत नाबाद 51 धावा केल्या. त्याच वेळी वुलवार्टने (57 धावा, 45 चेंडू) देखील नंतर वेग वाढवला आणि गार्डनरसोबत 81 धावांची भागीदारी केली.
आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने दुसऱ्याच षटकात शेफाली वर्माची विकेटही गमावली, परंतु एलिस कॅप्सी (22) आणि कर्णधार मेग लॅनिंग (18) यांनी सहाव्या षटकातच धावसंख्या 48 धावांपर्यंत नेली. कॅप्सी, लॅनिंग आणि जेमिमा रॉड्रिग्स सहाव्या आणि सातव्या षटकात बाद झाले. मॅरिजन कॅपने (36) डाव सांभाळला आणि संघाचा डाव पुढे चालू ठेवला पण दुसऱ्या बाजूने विकेट पडत राहिल्या. 14.3 षटकांत धावसंख्या केवळ 100 होती आणि 8 विकेट पडल्या होत्या. त्यानंतर अरुंधती रेड्डी (25) हिने धडाकेबाज खेळी केली आणि 18व्या षटकात 135 धावांपर्यंत मजल मारून संघाला विजयाची आशा दाखवली, पण शेवटच्या चेंडूवर ती बाद झाली. त्यानंतर पुढच्याच षटकात शेवटची विकेटही पडली. गुजराततर्फे गार्डनरने 3.4 षटकांत केवळ 19 धावा देत 2 बळी घेतले.