Deandra Dottin, WPL 2023: IPL म्हटलं की वाद होणारच.. मग ती पुरूषांची स्पर्धा असो वा महिलांचे WPL. महिला प्रीमियर लीग (WPL) सुरू झाली आणि पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सचा पराभव केला. मुंबईच्या शानदार सलामीत कर्णधार हरमनप्रीत कौरने मोलाची भूमिका बजावली. पण हंगामाची सुरुवात एका वादाने झाली असून, त्याबाबत गुजरात जायंट्सनेही एक निवेदन जारी केले आहे. वेस्ट इंडिजची खेळाडू डिएंड्रा डॉटिन महिला प्रीमियर लीगचा भाग बनू शकली नाही. तिला गुजरात जायंट्सने ६० लाख रुपयांना विकत घेतले होते, पण स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच संघाने तिच्या जागी दुसऱ्या खेळाडूला स्थान दिले.
काय आहे वाद?
डिएंड्रा डॉटिन तंदुरुस्त नसल्याने ती स्पर्धेत खेळू शकत नाही, असे विधान गुजरात जायंट्सने जारी केले. पण डिएंड्रा डॉटिनने मात्र संघाच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित करत ती पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे सांगितले. तिच्याबद्दल जे काही बोलले जात आहे त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये, असेही ती म्हणाली. डिएंड्रा डॉटिनने ट्विट करून लिहिले की, मला येत असलेल्या संदेशांसाठी मी तुमची आभारी आहे, पण सत्य काही वेगळेच आहे.
आता गुजरात जायंट्सने एक निवेदन जारी केले आहे आणि त्यांनी म्हटले आहे की डिएंड्रा डॉटिन एक महान खेळाडू आहे आणि संघासाठी खूप महत्वाची आहे. परंतु आम्हाला निर्धारित वेळेपूर्वी वैद्यकीय मंजुरी मिळाली नाही. WPL मध्ये सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंसाठी ती मंजुरी आवश्यक असते पण आम्हाला ते शक्य झालं नाही. आम्हाला आशा आहे की ती येत्या हंगामात आमच्यासोबत असेल.
दरम्यान, गुजरात जायंट्ससाठी मोसमाची सुरुवात चांगली झाली नाही. मुंबई इंडियन्सने गुजरातचा १४३ धावांनी पराभव केला. या सामन्यात मुंबईने २०७ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात जायंट्सचा डाव अवघ्या ६४ धावांत आटोपला.