WPL 2023, MI vs RCB : महिला प्रीमिअर लीगच्या २०२३ आजचा सामना मुंबई इंडियन्सने सहज जिंकला. गोलंदाजांच्या दमदार कामगिरीनंतर हेली मॅथ्यूज व नॅट शिव्हर-ब्रंट यांनी १००+ धावांची भागीदारी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पराभूत केले. हेली मॅथ्यूजची फटकेबाजी पाहून मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना किरॉन पोलार्डची आठवण झाली. WPL मध्ये मॅथ्यूज ही एकमेव वेस्ट इंडिजची खेळाडू आहे. मॅथ्यूजने गोलंदाजीत कमाल दाखवताना ३ विकेट्सही घेतल्या.
स्मृती व सोफी डिव्हाईन यांनी चांगली सुरुवात करून देताना ४.२ षटकांत फलकावर ३९ धावा चढवल्याय. पण, त्यानंतर हरमनप्रीतने फिरकी गोलंदाजांना मैदानावर आणले आणि ४ धावांत ४ विकेट्स पडल्या. बिनबाद ३९ वरून RCBची अवस्था ४ बाद ४३ अशी झाली. रिचा घोष व पेरी ही जोडी RCBचा डाव सावरताना दिसली अन् त्यांना दोन वेळा रन आऊट करण्याची संधी MI ने गमावलेली. मात्र. पुढच्याच षटकात पेरी ( १३) धावांवर रन आऊट झाली. ७१ वर ५ वी विकेट पडली. कनिका अहुजाने अनपेक्षित फटकेबाजी करून RCBच्या धावांची गती वाढवली. कनिका १३ चेंडूंत २२ धावांवर झेलबाद झाली. मॅथ्यूज पुन्हा गोलंदाजीला आली अन् तिने रिचाला २८ धावांवर झेल देण्यास भाग पाडले. श्रेयांका पाटील आणि मेगन शूट यांनी अखेरच्या षटकात सुरेख खेळ केला. या दोघींनी २० चेंडूंत ३४ धावा जोडल्या आणि शिव्हर-ब्रंटने ही जोडी तोडली. श्रेयांका १५ चेंडूंत २३ धावांवर माघारी परतली. एलेनिया केरने २ विकेट्स घेत RCBचा डाव १५५ धावांवर गुंडाळला.?
यास्तिका भाटिया व हेली मॅथ्यूज यांची सुरुवात चांगली झाली, परंतु प्रिती बोसने पहिली विकेट घेतली. यास्तिका २३ धावांवर बाद झाली. या एकमेव विकेटवर RCBला समाधान मानावे लागले. मॅथ्यूज व शिव्हर-ब्रंट यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९.२ षटकांत ११४ धावांची भागीदारी करून संघाला १४.२ षटकांत विजय मिळवून दिला. मॅथ्यूजने ३८ चेंडूंत १३ चौकार व १ षटकारासह नाबाद ७७, तर शिव्हर-ब्रंटने २९ चेंडूंत ९ चौकार व १ षटकारासह ५५ धावा केल्या.