wpl auction 2024 date । मुंबई : आयपीएलच्या धरतीवर सुरू झालेली महिला प्रीमिअर लीग आपल्या दुसऱ्या हंगामाकडे कूच करत आहे. ९ डिसेंबर रोजी मुंबईत महिला प्रीमिअर लीग २०२४ साठी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. यावेळी एकूण १६५ खेळाडूंनी WPL २०२४ च्या लिलावासाठी नोंदणी केली आहे. यामध्ये १०४ भारतीय आणि ६१ परदेशी खेळाडू आहेत. १६५ क्रिकेटपटूंपैकी १५ खेळाडू सहयोगी देशांचे आहेत, तर कॅप्ड खेळाडूंची एकूण संख्या ५६ आणि अनकॅप्ड खेळाडू १०९ आहेत. पाच संघांकडे जास्तीत जास्त ३० स्लॉट उपलब्ध आहेत, त्यापैकी ९ जागा परदेशी खेळाडूंसाठी असतील.
- दिल्ली कॅपिटल्स- आगामी हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्सकडे १५ खेळाडूंचा संघ आहे, यामध्ये ५ परदेशी खेळाडू आहेत. दिल्लीच्या फ्रँचायझीने आतापर्यंत ११.२५ कोटी रुपये खर्च केले आहेत तर २.२५ कोटी रुपये शिल्लक आहेत. दिल्ली कॅपिटल्समध्ये सध्या तीन स्लॉट रिक्त आहेत, त्यापैकी एक विदेशी खेळाडूसाठी असेल.
- गुजरात जायंट्स - त्याचप्रमाणे गुजरात जायंट्सकडे सध्या आठ खेळाडू असून त्यापैकी तीन परदेशी आहेत. फ्रँचायझीने आतापर्यंत ७.५५ कोटी रुपये खर्च केले आहेत आणि त्यांच्या पर्समध्ये ५.९५ कोटी रुपये शिल्लक आहेत. गुजरातच्या संघात सध्या १० खेळाडूंसाठी जागा रिक्त आहेत, ज्यात ३ परदेशी शिलेदार असतील.
- मुंबई इंडियन्स- चॅम्पियन मुंबई इंडियन्सकडे सध्या १३ खेळाडू आहेत, त्यापैकी पाच परदेशी आहेत. मुंबईच्या फ्रँचायझीने आतापर्यंत ११.४ कोटी रुपये खर्च केले आहेत आणि त्यांच्या पर्समध्ये २.२१ कोटी रुपये शिल्लक आहेत. संघात सध्या पाच खेळाडूंसाठी स्लॉट आहेत, त्यामध्ये एक परदेशी खेळाडू असेल.
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - पदार्पणाच्या हंगामातच निराशाजनक कामगिरी राहिलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघात सध्या तीन परदेशी खेळाडूंसह ११ खेळाडू आहेत. फ्रँचायझीने आतापर्यंत १०.१५ कोटी रुपये खर्च केले आहेत आणि त्यांच्या पर्समध्ये ३.३५ कोटी रुपये शिल्लक आहेत. आरसीबीच्या संघात सध्या ७ खेळाडूंसाठी स्लॉट रिक्त असून तीन परदेशी खेळाडूंचा यात समावेश होणार आहे.
- यूपी वॉरियर्स - यूपी वॉरियर्सच्या संघात सध्या ५ परदेशी खेळाडूंसह १३ शिलेदार आहेत. फ्रँचायझीने आतापर्यंत ९.५ कोटी रुपये खर्च केले आहेत आणि त्यांच्या कोट्यात ४ कोटी शिल्लक आहेत. संघात सध्या ५ खेळाडूंसाठी जागा असून यामध्ये एक परदेशी खेळाडूचा समावेश होईल.