WPL 2024 UP Warriorz vs Delhi Capitals : महिला प्रीमियर लीग (WPL) मध्ये भारताच्या दीप्ती शर्माने ( Deepti Sharma ) ऐतिहासिक कामगिरी केली. यूपी वॉरियर्स संघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या दीप्तीने ५९ धावांची वादळी खेळी आणि त्यानंतर हॅट्ट्रिक घेतली. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात अर्धशतक व हॅट्ट्रिक घेणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली. यूपी वॉरियर्सने ८ बाद १३८ धावा केल्या आणि त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघाला १३७ धावांत गुंडाळले. उत्कंठावर्धक सामन्यात यूपीने एका धावेने विजय मिळवला. दीप्तीने चार षटकांत १९ धावा देत ४ बळी घेतले.
दीप्ती WPL मध्ये हॅट्ट्रिक घेणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. तर डब्ल्यूपीएलच्या इतिहासातील ही दुसरी हॅटट्रिक आहे. २०२३ च्या मोसमात इंग्लंडच्या इसी वँगने हॅट्ट्रिक घेतली होती. दिल्लीचा अरुण जेटली मैदानात प्रथम फलंदाजीकरताना आणि कर्णधार ॲलिसा हिलीने २९ धावा केल्या, तर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या दीप्ती शर्माने ४८ चेंडूंत ६ चौकार आणि १ षटकारासह ५९ धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. दिल्ली कॅपिटल्सकडून तीतस साधू आणि राधा यादव यांनी प्रत्येकी सर्वाधिक दोन बळी घेतले.
१३९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंगने ४६ चेंडूत १२ चौकारांसह ६० धावांची स्फोटक खेळी खेळली. दीप्ती शर्माच्या फिरकीने कमाल केली. दिल्ली कॅपिटल्सचे उर्वरित फलंदाज ठराविक अंतराने बाद होत राहिले आणि एकवेळ १२४ धावांवर ५ विकेट पडल्या होत्या. यादरम्यान दीप्तीने १४व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मेग लॅनिंगला बाद केले. यानंतर १९व्या षटकाच्या पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर अनुक्रमे ॲनाबेल सदरलँड (६) आणि अरुंधती रेड्डी (०) यांना बाद करत हॅट्ट्रिक पूर्ण केली.
१२४ धावांवर पाच विकेट गमावलेल्या दिल्ली संघाने शेवटच्या षटकापर्यंत सामना नेला. त्यांना विजयासाठी ६ चेंडूत १० धावांची गरज होती. त्यानंतर राधा यादवने ग्रेस हॅरिसच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. यानंतर दुसऱ्या चेंडूवर दोन धावा झाल्या. पण राधा तिसऱ्या चेंडूवर बाद झाली. दिल्लीला तीन चेंडूंत विजयासाठी दोन धावांची गरज होती. त्यानंतर चौथ्या चेंडूवर जेस जॉन्सन धावबाद झाली आणि दोन चेंडूंवर दोन धावा असा सामना चुरशीचा झाला. पाचव्या चेंडूवर तीत साधूने थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू सोपवलाआणि दिल्लीचा संघ एक चेंडू अगोदर १३७ धावांवर ऑल आऊट झाला.
Web Title: WPL 2024 : Delhi Capitals losing 7 wickets in 17 balls against UP Warriorz; Deepti Sharma becomes the FIRST ever woman with a fifty and a hat-trick in a T20 match, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.