२३ तारखेपासून महिला प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या हंगामाला सुरूवात होत आहे. भारतीय महिला संघाची सलामीवीर स्मृती मानधना सलग दुसऱ्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहे. पदार्पणाचा हंगाम स्मृतीच्या आरसीबीसाठी एका वाईट स्वप्नाप्रमाणे राहिला. २०२३ च्या हंगामात आरसीबीला सुरूवातीचे पाच सामने गमवावे लागले होते. WPL 2024 ला सुरूवात होण्यापूर्वी मानधनाने क्रिकेटमधील कोणता महान विक्रम तिला आपल्या यादीत जोडायचा आहे याबाबत भाष्य केले आहे. आरसीबीने शेअर केलेल्या व्हिडीओत तिने याचा खुलासा केला आहे.
स्मृती मानधनाला रॅपिड फायरमध्ये १८ प्रश्न विचारण्यात आले. "तो कोणता महान विक्रम आहे जो तुला तुझ्या नावावर करायला आवडेल? या प्रश्नावर उत्तर देताना स्मृतीने म्हटले, "मला वाटते की, मी भारतासाठी सर्वाधिक विश्वचषक जिंकले आहेत हा विक्रम माझ्या नावावर व्हावा." खरं तर स्मृतीने आतापर्यंत एकही विश्वचषक जिंकला नाही. मात्र कारकिर्दीच्या अखेरीस हा विक्रम आपल्या नावावर असावा अशी इच्छा तिने व्यक्त केली.
स्मृती मानधना WPL साठी सज्ज
स्मृती सध्या भारतीय संघाची उपकर्णधार आहे आणि हरमनप्रीत कौरच्या गैरहजेरीत कर्णधारपद देखील सांभाळते. आरसीबीच्या संघाची धुरा तिच्या खांद्यावर आहे. आरसीबीला दिलेल्या मुलाखतीत स्मृतीने सांगितले की, तिचे टोपणनाव बेबू आहे, जे तिच्या वडिलांनी ठेवले. कारण स्मृती नाव उच्चारताना त्यांना फार कष्ट घ्यावे लागतात. विराट कोहली म्हणजे रनमशीन आहे. २०१६ च्या विश्वचषकातील तो सामना माझा फेव्हरेट आहे, ज्यामध्ये विराटने ऑस्ट्रेलियाविरूद्ध ८२ धावा केल्या होत्या.
आयपीएलप्रमाणे महिला क्रिकेटपटूंना देखील स्वत:ला सिद्ध करण्यासाठी एक व्यासपीठ मिळावे या उद्देशाने मागील वर्षीपासून महिला प्रीमिअर लीग ही स्पर्धा खेळवली जाते. या स्पर्धेचा पदार्पणाचा हंगाम केवळ मुंबईत खेळवला गेला होता. दुसऱ्या हंगामात मात्र मुंबईत एकही सामना होणार नाही. दिल्ली आणि बंगळुरू येथे ही स्पर्धा खेळवली जाईल. २३ फेब्रुवारीपासून महिला प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या पर्वाला सुरूवात होत आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ - स्मृती मानधना (कर्णधार), दिशा कसत, आशा शोभना, एलिसे पेरी, हेथर नाईट, कानिका अहुजा, श्रेयांका पाटील, सोफी डिव्हाइन, इद्रांनी रॉय, रिचा घोष, रेणुका सिंग, एकता बिश्त, केट क्रॉस, सिमरन बहादूर, जॉर्जिया वेअरहॅम, सबिनेनी मेघना, शुभा सथीश, सोफी मोलिनक्स.