WPL 2024: Journey of SAJANA SANJEEVAN: महिला प्रीमिअर लीग (WPL 2024) मध्ये मुंबई इंडियन्ससाठी एका चेंडूवर षटकार ठोकून संघाला विजय मिळवून देणारी संजीवन सजना प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. सजनाने महिला प्रीमिअर लीगमध्येमुंबई इंडियन्सला विजयासाठी १ चेंडूंत ५ धावांची गरज असताना खणखणीत षटकार मारून दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रोमहर्षक विजय मिळवून दिला.
WPL 2024 चा पहिला सामना Mumbai Indians Vs Delhi Capitals यांच्यात खेळला गेला. मुंबई संघाने ४ विकेट्स राखून हा सामना जिंकला. मुंबई संघाला १ चेंडूत ५ धावांची गरज होती. पदार्पणाच्या सामन्यात तिने क्रीजबाहेर येऊन षटकार ठोकला. २९ वर्षीय खेळाडूला मागील मोसमात कोणत्याच संघाने आपल्या ताफ्यात घेण्यास रस दाखवला नव्हता.
४ जानेवारी १९९५ रोजी केरळमधील वायनाड येथील मनंथवाडी येथे जन्मलेल्या सजीवन सजना सामान्य कुटुंबात जन्माला आली. तिने तिच्या क्रिकेट प्रवासात अनेक आव्हानांचा सामना केला आहे. तिचे वडील रिक्षाचालक होते. सजना वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत प्लास्टिकचे गोळे आणि नारळाच्या बॅटने सराव करत होती. टीम इंडियाचा माजी क्रिकेटर गौतम गंभीरने तिला त्याची बॅट भेट दिली. केरळच्या पुरात तिचे संपूर्ण घर जवळजवळ वाहून गेले होते. पण, तरीही तिने हार मानली नाही आणि पुन्हा उभी राहून क्रिकेट खेळले.
सजना अष्टपैलू खेळाडू आहे आणि मुंबई इंडियन्सकडून पदार्पण होण्यापूर्वी ती केरळ, दक्षिण विभाग आणि भारत अ संघाकडून खेळली होती. भारत आणि दिल्ली कॅपिटल्सची खेळाडू मिन्नू मणी नंतर WPL मध्ये प्रवेश करणारी कुरिचिया जमातीतील सजना ही दुसरी क्रिकेटपटू आहे. १० लाखांच्या मूळ किमतीने स्पर्धेत उतरलेल्या या क्रिकेटपटूला WPL 2024 च्या लिलावात मुंबई इंडियन्सने १५ लाखांत आपल्या ताफ्यात घेतले.
सजनाचा प्रवास २०१९ मध्ये केरळच्या २३ वर्षांखालील संघाचे नेतृत्व करून ट्वेंटी-२० सुपर लीगच्या विजेतेपदापर्यंत पोहोचला. तिने सिनियर महिला ट्वेंटी-२० ट्रॉफी २०२३ मध्ये ७ डावात १३४ धावा केल्या आणि अचूक गोलंदाजी करत ६ विकेट घेतल्या.