Join us  

WPL 2024: आरसीबी अंतिम फेरीत; मुंबईला ५ धावांनी नमवले

आरसीबीने पहिल्यांदाच डब्ल्यूपीएलची अंतिम फेरी गाठली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2024 8:26 AM

Open in App

नवी दिल्ली : दडपणाच्या स्थितीत नियंत्रण गमावलेल्या मुंबई इंडियन्सला डब्ल्यूपीएलच्या एलिमिनेटर लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (आरसीबी) संघाविरुद्ध ५ धावांनी पराभव पत्करावा लागला. यासह आरसीबीने पहिल्यांदाच डब्ल्यूपीएलची अंतिम फेरी गाठली. रविवारी आरसीबी जेतेपदासाठी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध भिडेल. 

मुंबईने आरसीबीला २० षटकांत ६ बाद १३५ धावांवर रोखले. परंतु, मुंबईला २० षटकांत ६ बाद १३० धावाच करता आल्या. सावध सुरुवात केल्यानंतरही मोक्याच्यावेळी मुंबईची फलंदाजी कोलमडली. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि अमेलिया केर यांनी चौथ्या बळीसाठी ४४ चेंडूंत ५२ धावांची भागीदारी करत मुंबईच्या आशा कायम ठेवल्या होत्या. परंतु, १८व्या षटकांत श्रेयांका पाटीलने हरमनप्रीतला बाद केले आणि आरसीबीने मिळवलेली पकड अखेरपर्यंत कायम राखली. हरमनप्रीतने ३० चेंडूंत ४ चौकारांसह ३३, तर अमेलियाने २५ चेंडूंत २ चौकारांसह नाबाद २७ धावा केल्या. श्रेयांकाने २ बळी घेतले. हरमनप्रीत बाद झाल्यानंतर मुंबईकरांना दडपणातून सावरता आले नाही.

त्याआधी, हायली मॅथ्यूज आणि नताली स्किव्हर-ब्रंट यांनी आरसीबीला मर्यादित धावसंख्येत रोखले. एलिसे पेरीच्या शानदार नाबाद अर्धशतकाच्या जोरावर आरसीबीने समाधानकारक मजल मारली. दुसऱ्या षटकापासून बळी घेत मुंबईकरांनी आरसीबीचा अर्धा संघ ८४ धावांमध्ये बाद केला. मॅथ्यूज, स्कीव्हर-ब्रंट आणि साइका इशाक यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. आरसीबीकडून पेरीने एकाकी झुंज देताना ५० चेंडूंत ८ चौकार व एका षट्कारासह ६६ धावा फटकावल्या. तिने सहाव्या बळीसाठी जॉर्जिया वेरहॅमसोबत २६ चेंडूंत ४५ धावांची भागीदारी केली.

संक्षिप्त धावफलक :

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर : २० षटकांत ६ बाद १३५ धावा (एलिसे पेरी ६६, जॉर्जिया वेरहॅम नाबाद १८, रिचा घोष १४; हायली मॅथ्यूज २/१८, नताली स्किव्हर-ब्रंट २/१८, साइका इशाक २/२७.) वि. वि. मुंबई इंडियन्स : २० षटकांत ६ बाद १३० धावा (हरमनप्रीत कौर ३३, अमेलिया केर नाबाद २७; श्रेयांका पाटील २/१६.) 

टॅग्स :महिला प्रीमिअर लीग