Smriti Mandhana And Deepti Sharma | बंगळुरू: महिला प्रीमिअर लीगच्या यंदाच्या हंगामात स्मृती मानधनाच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ चमकदार कामगिरी करत आहे. सोमवारी झालेल्या सामन्यात आरसीबीने यूपी वॉरियर्सचा २३ धावांनी पराभव केला. हा शेवटचा सामना ठरला, जो स्मृतीच्या संघाने त्यांच्या घरच्या स्टेडियमवर खेळला. (RCB vs UPW WPL 2024) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने महिला प्रीमिअर लीग २०२४ मध्ये सोमवारी यूपी वॉरियर्स संघावर २३ धावांनी विजय मिळवला. RCB ने प्रथम फलंदाजी करताना ३ बाद १९८ धावांचा डोंगर उभा केला, परंतु UPW ला ८ बाद १७५ धावाच करता आल्या. कर्णधार स्मृती मानधना व एलिसे पेरी (ELLYSE PERRY) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर RCB ने या धावा उभ्या केल्या.
यूपी वॉरियर्सकडून कर्णधार ॲलिसा हिली (५५), दीप्ती शर्मा (३३) व पूनम खेमनार (३१) यांनी संघर्ष केला. पण, या सामन्यात ३७ चेंडूंत ५८ धावा कुटणाऱ्या एलिसे पेरीने हवा केली. तिने स्फोटक खेळी करून प्रतिस्पर्धी संघाच्या अडचणी वाढवल्या. या सामन्यात स्मृती फलंदाजी करत असताना एक नाट्यमय घडामोड घडली.
खरं तर झाले असे की, आरसीबीच्या डावाच्या अकराव्या षटकात दीप्ती शर्मा गोलंदाजी करत होती. दीप्तीने स्मृती मानधनाला चेंडू टाकताना अचानक ब्रेक घेतला. ११व्या षटकातील चौथ्या चेंडूवर हा प्रकार घडला. दीप्ती चेंडू टाकायला आली असता अचानक थांबली अन् प्रेक्षकांनी आनंद लुटला. मग पुन्हा एकदा दीप्ती चेंडू टाकायला आली असता स्मृतीने तिची फिरकी घेतली.
तत्पुर्वी, यूपी वॉरियर्सची कर्णधार ॲलिसा हिलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. स्मृती मानधना आणि सबिनेनी मेघना (२८) यांच्यात सलामीच्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी झाली. मानधनाने ५० चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ८० धावा केल्या. पण खरा चमत्कार रिचा घोषने केला, जिने १० चेंडूत २ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने नाबाद २१ धावा केल्या. एलिसे पेरीने आपल्या खेळीत ४ चौकार आणि ४ षटकार मारले. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ३ बाद १९८ धावा केल्या. प्रत्युत्तरात यूपी वॉरियर्सने ८ बाद अवघ्या १७५ धावा केल्या अन् २३ धावांनी सामना गमावला.