महिला प्रीमियर लीगच्या (WPL) तिसऱ्या सत्राला शुक्रवारपासून वडोदरा येथून दणक्यात सुरुवात होईल. गतविजेते बंगळुरू आणि गुजरात यांच्यातील सलामी लढतीने या स्पर्धेला सुरुवात होईल. या स्पर्धेत भारतीय देशांतर्गत स्पर्धेत छाप सोडणाऱ्या खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पहिल्या दोन हंगामातील कामगिरीच्या जोरावर या दोघींनी मारली टीम इंडियात एन्ट्री
गेल्या दोन सत्रांमध्ये डब्ल्यूपीएलद्वारे भारतीय क्रिकेटला अनेक गुणवान महिला क्रिकेटपटू लाभल्या. त्यामुळे यंदाच्या सत्रात कोणते खेळाडू चमकणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. पहिल्या दोन सत्रांत श्रेयांका पाटील आणि साइका इशाकसारख्या खेळाडूंनी दडपणाच्या स्थितीत दमदार कामगिरी करत भारतीय संघात स्थान मिळवले.
भारतीय महिला क्रिकेट आणखी मजबूत होईल
मुंबई आणि भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने म्हटले की, 'भारतीय कर्णधार म्हणून यंदाच्या सत्रासाठी माझी उत्सुकता वाढली आहे. अनेक भारतीय क्रिकेटपटू या स्पर्धेतून छाप पाडण्यास उत्सुक आहेत. लिलावाआधीही आम्ही भारतीय खेळाडूंबाबत चर्चा केली होती. आशा आहे की, यंदाच्या सत्रात भारतीय खेळाडू दमदार कामगिरी करून भारतीय क्रिकेटला आणखी मजबूत करतील.'
शेफालीसह अन्य खेळाडूंवर असतील नजरा
त्याच वेळी, शेफाली वर्मासारख्या काही अनुभवी खेळाडूंना पुन्हा एकदा राष्ट्रीय संघात स्थान मिळविण्यासाठी ही स्पर्धा निर्णायक ठरेल. जुलैमध्ये भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून त्यानंतर भारतात विश्वचषक स्पर्धाही रंगणार आहे. अष्टपैलू केशवी गौतमही आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी चमकदार कामगिरीचा प्रयत्न करेल.