vrinda dinesh cricketer । मुंबई : ९ डिसेंबर रोजी मुंबईत महिला प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या हंगामासाठी लिलाव पार पडला. पाच फ्रँचायझींनी बोली लावून काही नामांकित अन् काही नवख्या खेळाडूंना आपल्या संघाचे भाग बनवले. खरं तर भारताच्या अनकॅप्ड खेळाडूंवर लागलेली कोट्यवधींची बोली क्रिकेट वर्तुळाचे लक्ष वेधून गेली. भारताची अनकॅप्ड टॉप ऑर्डर फलंदाज वृंदा दिनेश हिने सर्वांना चकित केले. लिलावात तिची मूळ किंमत १० लाख रुपये होती. तिला यूपी वॉरियर्सने १.३० कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात घेतले. अनेक नामांकित खेळाडू अनसोल्ड राहिले असताना वृदांवर लागलेली ही बोली क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे.
वृंदाला लिलावात मोठी बोली लागल्यानंतर तिने यूपी वॉरियर्सच्या फ्रँचायझीसोबत बोलताना तिच्या स्वप्नाबद्दल भाष्य केले. तिने म्हटले की, माझ्या आईच्या डोळ्यात अश्रू होते. म्हणून मी व्हिडीओ कॉल न करता साधा कॉल केला. मला एवढी मोठी रक्कम मिळेल याची कल्पना नव्हती. हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. मला या पैशातून आई-वडिलांचा सन्मान करायचा आहे, त्यांना एक कार भेट देऊन त्यांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. आताच्या घडीला माझे लक्ष्य हेच आहे. वृंदा दिनेशवर लागलेली बोली सर्वांचे लक्ष वेधणारी ठरली. ती कर्नाटककडून देशांतर्गत क्रिकेट खेळते. २३ वर्षीय फलंदाजाने वरिष्ठ महिला ट्वेंटी-२० ट्रॉफीमध्ये सात डावात १५४.०१ च्या स्ट्राईक रेटने २११ धावा केल्या आहेत. ती भारत अ संघाकडून इंग्लंड अ विरुद्ध खेळली होती.
१० लाख ते २ कोटी
वृंदा दिनेशशिवाय भारताची अनकॅप्ड खेळाडू काशवी गौतमवर लागलेली बोली देखील अविश्वसनीय ठरली. काशवी गौतम हिला खरेदी करण्यासाठी गुजरात जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत झाली. यानंतर आरसीबीने अखेर माघार घेतली अन् काशवी गुजरातच्या ताफ्यात गेली. आरसीबीने माघार घेतल्यानंतर यूपी वॉरियर्सने बोली लावायला सुरुवात केली होती. यूपी आणि गुजरातमध्ये जोरदार लढत झाली. तिची मूळ किंमत १० लाख रुपये होती आणि तिला गुजरात जायंट्सने २ कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात घेतले.
यंदाच्या लिलावातील टॉप-५ महागडे खेळाडू
- काशवी गौतम (भारत) - २ कोटी
- ॲनाबेल सदरलँड (ऑस्ट्रेलिया) - २ कोटी
- वृंदा दिनेश (भारत) - १.३० कोटी
- शबनीम इस्माइल (दक्षिण आफ्रिका) - १ कोटी २० लाख
- फोबी लिचफील्ड (ऑस्ट्रेलिया) - १ कोटी
Web Title: WPL Auction India's uncapped player Vrinda Dinesh said after fetching Rs 1.30 crore in Women's Premier League auction, she wants to gift a car to my parents with this money
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.