WPL Final, DC vs RCB Live Updates | नवी दिल्ली: आज महिला प्रीमिअर लीगला एक नवा चॅम्पियन मिळणार आहे. किताबासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात नवी दिल्लीत अरूण जेटली स्टेडियमवर सामना खेळवला जात आहे. मागील हंगामातील गतविजेता दिल्ली आणि मागील हंगामातील सर्वात अपयशी संघ ठरलेल्या आरसीबी यांच्या लढतीला विविध कारणांनी महत्त्व आले आहे. नाणेफेक जिंकून दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंगने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत शेफाली वर्माने स्फोटक सुरूवात केली. तिने कर्णधार मेग लॅनिंगसोबत पहिल्या बळीसाठी ७.१ षटकांपर्यंत ६४ धावांची भागीदारी नोंदवली. पण शेफाली बाद होताच दिल्लीचा गड कोसळला अन् आरसीबीने जोरदार पुनरागमन केले.
सोफी मोलिनक्सने शेफालीला तर श्रेयांका पाटीलने मेग लॅनिंगला बाहेरचा रस्ता दाखवला. यानंतर विकेट्सची जणू काही मालिकाच सुरू झाली. सलामीवीर जोडी आणि राधा यादव वगळता दिल्लीच्या एकाही फलंदाजाला १० हून अधिक धावा करता आल्या नाहीत. शेफाली वर्मा (४४) आणि मेग लॅनिंगने (२३) धावा करून आपल्या घरच्या चाहत्यांच्या आशा कायम ठेवल्या. दिल्लीच्या संघाची आघाडीची फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज हिला देखील आजच्या या महत्त्वाच्या सामन्यात साजेशी खेळी करता आली नाही. ती खातेही न उघडता तंबूत परतली.
दिल्लीचा डाव सुरू होताच शेफाली वर्माने आरसीबीच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. तिने २७ चेंडूत ४४ धावा कुटल्या. तिच्या खेळीत तिने ३ षटकार आणि २ चौकार लगावले, तर लॅनिंगने ३ चौकारांच्या मदतीने २३ चेंडूत २३ धावांची साजेशी खेळी केली. दिल्लीकडून लॅनिंग (२३), शेफाली (४४), जेमिमा रॉड्रिग्ज (०), एलिस कॅप्सी (०), मारिझान कॅप (८), जेस जोनासेन (३), राधा यादव (१२), मिन्नू मणी (४), अरूधंती रेड्डी (१०) आणि तानिया भाटियाने (०) धावा केल्या. दिल्लीचा संघ निर्धारित २० षटके देखील खेळू शकला नाही आणि १८.३ षटकांत ११३ धावांवर सर्वबाद झाला. आरसीबीकडून श्रेयांका पाटीलने सर्वाधिक (४) बळी घेतले, तर सोफी मोलिनक्स (३) आणि शोभना आशाने (२) बळी घेतले. त्यामुळे विजेतेपद पटकावण्यासाठी आरसीबीसमोर ११४ धावांचे सोपे आव्हान आहे.
दरम्यान, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांनी अद्याप एकदाही जेतेपद पटकावले नाही. त्यामुळे आज जगाला एक नवा विजेता मिळणार आहे. आरसीबीचा पुरुष संघ तीन वेळा आयपीएलचा उपविजेता ठरला आहे. २००९ मध्ये अंतिम फेरीत डेक्कन चार्जर्सकडून त्यांना पराभव झाला होता. यानंतर २०११ मध्ये चेन्नईने आरसीबीच्या संघाचा पराभव करून विजेतेपदावर कब्जा केला, तर पाच वर्षांनंतर २०१६ मध्ये सनरायझर्स हैदराबादने विराट कोहलीच्या सेनेचा पराभव करून विजेतेपदाची संधी हिरावून घेतली होती. त्याचवेळी दिल्ली कॅपिटल्सला फक्त एकदाच फायनल खेळण्याची संधी मिळाली. आयपीएल २०२० मध्ये संघ प्रथमच दिल्लीचा संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. पण त्यांना मुंबईकडून पराभव पत्करावा लागला.
आजच्या सामन्यासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ -मेग लॅनिंग (कर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, एलिस कॅप्सी, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), मारिझान कॅप, शिखा पांडे, जेस जोनासेन, अरुंधती रेड्डी, राधा यादव, मिन्नू मणी.
आजच्या सामन्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ -स्मृती मानधना (कर्णधार), एस मेघना, एलिसे पेरी, सोफी डिव्हाईन, रिचा घोष (यष्टीरक्षक), जॉर्जिया वेरेहम, दिशा कसाट, सोफी मोलिनक्स, श्रेयंका पाटील, शोभना आशा, रेणुका सिंग.