इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक विजेते पटकावण्याचा मान मुंबई इंडियन्सच्या संघाकडे आहे. दरम्यान, यावर्षी प्रथमच झालेल्या वुमेन्स प्रीमियर लिगमध्येदी मुंबई इंडियन्सनेच आपला दबदबा राखला. मुंबईच्या संघाने अटीतटीच्या झालेल्या अंतिम लढतीत दिल्ली कॅपिटल्सच्या संघावर अखेरच्या षटकात मात करत मुंबईने पहिल्यावहिल्या डब्ल्यूपीएलच्या विजेतेपदाला गवसणी घातली. दिल्लीने दिलेले १३२ धावांचे आव्हान मुंबईने १९.३ षटकांमध्ये पार केले.
या लढतीत दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र शेफाली वर्मा सुरुवातीलाच ११ धावा काढून बाद झाल्याने दिल्लीची सुरुवात अडखळती झाली. मुंबईच्या इसी वाँग हिने केलेल्या भेदक माऱ्यासमोर दिल्लीचा आघाडीचा फळी कोलमडली. कर्णधार मॅग लेनिंगचा (३५) अपवाद वगळता इतर फलंदाजांनी निराशा केल्याने दिल्लीला २० षटकांत ९ बाद १३१ धावाच करता आल्या. मुंबईकडून हेली मॅथ्यू आणि इसी वँग यांनी प्रत्येकी ३ तर एमिला कीर हिने दोन विकेट्स टिपल्या.
१३२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबईची सुरुवातही चांगली झाली नाही. हेली मॅथ्यू (१३) आणि यास्तिका भाटिया (४) झटपट बाद झाल्या. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर (३७) आणि ब्रंट (नाबाद ६०) यांनी मुंबईला सावरत विजयाच्या दिशेने नेले. मात्र हरमनप्रीच कौर धावबाद होऊन माघारी परतली. त्यानंतर दिल्लीने अखेरच्या षटकांमध्ये वाढवलेला दबाव झुगारत ब्रंट आणि एमिला कीर (नाबाद १४) यांनी मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब करत संघाला डब्ल्यूपीएलचे पहिले वहिले विजेतेपद मिळवून दिले.