WPL Final, DC vs RCB Live Updates | नवी दिल्ली: दिल्ली कॅपिटल्सला नमवून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने ऐतिहासिक कामगिरी केली. मागील हंगामातील उपविजेता दिल्ली कॅपिटल्सला यंदा देखील उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले. मुंबई इंडियन्सला पराभूत करून फायनलचे तिकीट मिळवलेल्या आरसीबीने सांघिक खेळी केली. प्रथम गोलंदाजीत मग फलंदाजीत चमक दाखवत स्मृती मानधनाच्या नेतृत्वातील संघाने ट्रॉफी उंचावली. दिल्ली कॅपिटल्सचा ८ विकेट राखून पराभव करून बंगळुरूने महिला प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या हंगामाचे जेतेपद पटकावले. त्यामुळे दिल्लीला सलग दुसऱ्यांदा ट्रॉफीने हुलकावणी दिली.
११४ धावांच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताता कर्णधार स्मृती मानधना (३१) आणि सोफी डिव्हाईन (३२) यांनी चांगली सुरुवात केली. आरसीबीला संघाच्या ४९ धावांवर पहिला झटका बसला. त्यानंतर ८२ धावांवर कर्णधाराच्या रूपात आरसीबीने आपली दुसरी विकेट गमावली. चांगली सुरुवात झाल्यानंतर एलिसे पेरीने मोर्चा सांभाळला. पेरीने ३७ चेंडूत नाबाद ३५ धावा करून आपल्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. तर रिचा घोषने १४ चेंडूत १७ धावांची नाबाद खेळी केली. आरसीबीने १९.३ षटकांत २ बाद ११५ धावा केल्या आणि ८ विकेट राखून विजय मिळवला. दिल्लीकडून शिखा पांडे आणि मिन्नू मणी यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.
दिल्ली कॅपिटल्सची निराशाजनक कामगिरीनाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सकडून शेफाली वर्माने स्फोटक सुरूवात केली. तिने कर्णधार मेग लॅनिंगसोबत पहिल्या बळीसाठी ७.१ षटकांपर्यंत ६४ धावांची भागीदारी नोंदवली. पण शेफाली बाद होताच दिल्लीचा गड कोसळला अन् आरसीबीने जोरदार पुनरागमन केले. सलामी जोडी आणि राधा यादव वगळता दिल्लीच्या एकाही फलंदाजाला १० हून अधिक धावा करता आल्या नाहीत. शेफाली वर्मा (४४) आणि मेग लॅनिंगने (२३) धावा करून आपल्या घरच्या चाहत्यांच्या आशा कायम ठेवल्या होत्या. पण त्यांना जास्त वेळ खेळपट्टीवर टिकता आले नाही.
दिल्लीचा डाव सुरू होताच शेफाली वर्माने आरसीबीच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. तिने २७ चेंडूत ४४ धावा कुटल्या. तिने ३ षटकार आणि २ चौकार लगावले, तर लॅनिंगने ३ चौकारांच्या मदतीने २३ चेंडूत २३ धावांची साजेशी खेळी केली. दिल्लीकडून लॅनिंग (२३), शेफाली (४४), जेमिमा रॉड्रिग्ज (०), एलिस कॅप्सी (०), मारिझान कॅप (८), जेस जोनासेन (३), राधा यादव (१२), मिन्नू मणी (४), अरूधंती रेड्डी (१०) आणि तानिया भाटियाने (०) धावा केल्या. दिल्लीचा संघ निर्धारित २० षटके देखील खेळू शकला नाही आणि १८.३ षटकांत ११३ धावांवर सर्वबाद झाला. आरसीबीकडून श्रेयांका पाटीलने सर्वाधिक (४) बळी घेतले, तर सोफी मोलिनक्स (३) आणि शोभना आशाने (२) बळी घेतले. दिल्लीने दिलेल्या ११४ धावांच्या सोप्या आव्हानाचा सहज पाठलाग करून आरसीबीने ऐतिहासिक कामगिरी केली.
आजच्या सामन्यासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ -मेग लॅनिंग (कर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, एलिस कॅप्सी, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), मारिझान कॅप, शिखा पांडे, जेस जोनासेन, अरुंधती रेड्डी, राधा यादव, मिन्नू मणी.
आजच्या सामन्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ -स्मृती मानधना (कर्णधार), एस मेघना, एलिसे पेरी, सोफी डिव्हाईन, रिचा घोष (यष्टीरक्षक), जॉर्जिया वेरेहम, दिशा कसाट, सोफी मोलिनक्स, श्रेयंका पाटील, शोभना आशा, रेणुका सिंग.