बंगळुरू : रिचा घोष आणि एस. मेघना यांची शानदार अर्धशतके आणि सोभना आशा हिच्या पाच बळींच्या जोरावर राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने डब्ल्यूपीएल महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत अत्यंत रोमांचक ठरलेल्या सामन्यात यूपी वाॅरिअर्स संघावर अवघ्या दोन धावांनी विजय मिळवला. बंगळुरूने २० षटकांत ६ बाद १५७ धावा केल्या. यूपी वाॅरियर्स संघाला २० षटकांत ७ बाद १५५ धावांवर रोखून बंगळुरूने विजय साकारला.
विजयासाठी १५८ धावांचा पाठलाग करताना सोभना आशा (५-२२) हिच्या गोलंदाजीपुढे यूपी वाॅरियर्सची फलंदाजी ढेपाळली. यूपीकडून ग्रेस हॅरिस (३८), श्वेता सेहरावत (३१) आणि ताहिला सेहरावत (२२) यांनी झुंज दिली. बंगळुरूकडून सोभना आशा हिच्याशिवाय सोफी मोलिनक्स आणि जाॅर्जिया वेअरहॅम यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. यूपीला विजयासाठी अखेरच्या चेंडूवर पाच धावांची गरज असताना दीप्ती शर्मा (नाबाद १३) हिला दोनच धावा करता आल्या. त्याआधी, बंगळुरूकडून एस. मेघना आणि रिचा घोष यांनी चौथ्या गड्यासाठी ७१ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. एस. मेघनाने ५३, तर रिचाने ६२ धावा करत संघाला १५०च्या पुढे नेले.
संक्षिप्त धावफलक राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू : २० षटकांत ६ बाद १५७ धावा (रिचा घोष ६२, एस. मेघना ५३) गोलंदाजी : राजेश्वरी गायकवाड २-२४.यूपी वाॅरियर्स : २० षटकांत ७ बाद १५५ धावा (ग्रेस हॅरिस ३८, श्वेता सेहरावत ३१) गोलंदाजी : सोभना आशा ५-२२, जाॅर्जिया वेअरहॅम १-२३.