टीम इंडियाचा यष्टिरक्षक वृद्धिमान साहा (Wriddhiman Saha) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याचे कारण त्याची स्फोटक खेळी नसून काही वेगळंच आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी त्याची माफी मागावी अशी मागणी त्याने केली आहे. ताज्या अहवालानुसार, वृद्धिमान साहाला आता बंगालसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळायचे नाही, म्हणून त्याने दुसऱ्या राज्य संघाकडून खेळण्यासाठी CAB कडे अर्ज केला आहे.
नक्की काय घडलं?
मिळालेल्या रिपोर्टनुसार, CAB सहाय्यक सचिव देबब्रत दास यांच्या वक्तव्यामुळे वृद्धिमान साहा नाराज आहे. देबब्रत दास यांनी साहाच्या बांधिलकीबाबत जाहीरपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. साहाने रणजी ट्रॉफीच्या साखळी सामन्यांमध्ये बंगाल संघातून न खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या कुटुंबातील एका सदस्याची प्रकृती खराब असल्याचे त्याने सांगितले होते. पण हे कारण कितपत खरं आहे, अशी शंका उपस्थित केल्याने वृद्धिमान साहा नाराज झाला होता.
इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या संयुक्त सचिवांनी केलेल्या वक्तव्यामुळे साहा संतापला असून आता त्याने राज्य संघातूनच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. इतकंच नाही तर आता त्यांनी माफी मागावी, अशी मागणीही साहाने केली आहे.
CAB प्रमुखांनी साहाशी साधला संवाद
बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अभिषेक दालमिया यांनी संयुक्त सचिवांच्या विधानापासून स्वतःला दूर केले आणि साहाला त्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती केली. काही बातम्यांनुसार, दोघांमध्ये फोनवर संभाषणही झाले. सध्या साहा हा गुजरात टायटन्स संघाचा भाग आहे आणि त्याने चांगली कामगिरीही केली आहे. हा संघ प्ले-ऑफमध्ये पोहोचला असून त्यांचा एक सामना कोलकातामध्येच होणार आहे. या दरम्यान साहा आणि कोलकाता क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक होऊ शकते. मात्र, या वादावर तोडगा निघण्यासाठी आयपीएल संपण्याचीच वाट पाहावी लागणार आहे.