भारताचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धीमान साहा सध्या क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. भारतीय कसोटी संघात स्थान न मिळाल्यानं संतापलेल्या साहानं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याबाबतची वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर एका पत्रकारानं मुलाखतीसाठी धमकावल्याचा आरोपही साहा यानं ट्विटरवर व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रिनशॉट शेअर करत केला होता. आता पुन्हा एकदा वृद्धीमान साहा यानं ट्विट्सची मालिका करत या प्रकरणावर आपलं रोखठोक मत व्यक्त केलं आहे.
पत्रकारानं धमकावल्याच्या प्रकरणात साहानं आज पुन्हा एकदा तीन ट्विट्स केली आहेत. "मी घडलेल्या प्रकारामुळे खरंच खूप व्यथित आणि दु:खी झालो होतो. अशापद्धतीची वागणुक सहन केली जाऊ नये असं वाटत होतं आणि इतर कुणी अशा प्रसंगाला पुन्हा सामोरं जाऊ नये असं मला वाटत होतं. म्हणूनच मी व्हॉट्सअॅप चॅट सर्वांसमोर आणण्याचा निर्णय घेतला. पण संबंधित व्यक्तीचं नाव जाहीर न करण्याचंही तारतम्य मी बाळगलं", असं वृद्धीमान साहा यानं ट्विट केलं आहे.
"आपल्यामुळे एखाद्याच्या करिअरचं नुकसान व्हावं असं मला वाटत नाही. त्यामुळे मानवतेच्या दृष्टीकोनातून आणि संबंधित व्यक्तीच्या कुटुंबीयांचा विचार करुन मी नाव जाहीर केलं नाही. पण असा प्रकार यापुढे घडल्यास मी खपवून घेणार नाही", असंही वृद्धीमान साहा यानं म्हटलं आहे.
वीरेंद्र सेहवागनं केला रिप्लाय
वृद्धीमान साहाच्या ट्विट्सला भारतीय संघाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग यानंही रिप्लाय दिला आहे. वीरू नेहमीच त्याच्या ट्विट्सबाबत चर्चेत असतो. त्यानं केलेले ट्विट्स रोखठोक आणि तितकेच कल्पक देखील असतात. आता वृद्धीमान साहाच्या वादातही वीरुनं उडी घेत एक सल्ला त्याला देऊ केला आहे. "प्रिय वृद्धी, इतरांना इजा पोहोचविण्याचा तुझा स्वभाव नाही आणि तू एक अद्भूत व्यक्ती आहेस. पण भविष्यात इतर कुणाला असा त्रास होऊ नये म्हणून त्याचे नाव सर्वांना कळणं गरजेचं आहे. एक दिर्घ श्वास घे आणि नाव सांगून टाक", असं सेहवागनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
भारतीय संघातून बाहेर झाल्यानंतर मुलाखतीसाठी दबाव आणणाऱ्या एका पत्रकाराने धमकी दिल्याचा दावा करत वृद्धिमान साहाने खळबळ उडवून दिली होती. साहाने या पत्रकाराचे नाव अद्याप सांगितलेले नाही. दरम्यान, बीसीसीआयने कितीही दबाव आणला तरी यापुढेही त्या पत्रकाराचं नाव जाहीर करणार नाही, असे वृद्धिमान साहाने स्पष्ट केले आहे. वृद्धिमान साहाने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर व्हॉट्सअॅप मेसेजचा एक स्क्रिनशॉट शेअर केला होता. तसेच पत्रकारितेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. साहाच्या या ट्विटनंतर भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री, माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंह यांनी त्याला पाठिंबा दिला होता.
Web Title: wriddhiman saha first tweet after journalist threatening ind vs sl series virendra sehwag gives replay
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.