Wriddhiman Saha Reaction on journalist Controversy: भारताचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा काही दिवसांपासून चर्चेत आहे. एका प्रसिद्ध क्रीडा पत्रकाराने त्याला मेसेजच्या माध्यमातून धमकी दिल्याचा त्याने केला होता. त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) धमकीच्या वादाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली होती. BCCIच्या समितीने, धमकी देणाऱ्या पत्रकाराचे नाव सांगण्यास सांगितले. त्यामुळे अखेर साहाने पत्रकाराचं नाव उघड केलं. त्यानंतर या घटनेबाबत साहाने मौन सोडलं.
२० वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत माझ्या अशाप्रकारची अरेरावीची भाषा किंवा संभाषण कोणीही केलं नव्हतं, असं साहा म्हणाला. गुजरात टायटन्सने शेअर केलेल्या एका व्हिडिओ पोस्टमध्ये साहा म्हणाला, “मी गोष्टींचा फार विचार करत नाही. जे घडेल त्याचा तेवढ्याच काळासाठी मी विचार करतो. त्यानंतर काय झालं ते मी विसरून जातो. त्यामुळे जे काही बोलायचं असेल तर त्या वेळी त्याचा विचार करून मी सांगतो."
"मी गेली २० वर्षे क्रिकेट खेळतोय. पण माझ्यासोबत असा प्रसंग कधीही घडला नव्हता. माझ्याशी कोणीच असं बोललं नव्हतं. इतकी वर्षे खेळूल्यानंतर असं बोललं जाईल अशी अपेक्षा मी केली नव्हती. त्यामुळे मला वाईट वाटलं. मी ज्या संघाकडून खेळतो त्या संघासाठी मी सर्व प्रयत्न करत असतो. फलंदाजी असो किंवा विकेटकीपिंग असो.. मी झोकून देतो. माझ्या आयुष्यात मागे काय चालले आहे, हा वेगळा मुद्दा आहे", असंही साहा म्हणाला.
दरम्यान, काही वेळाने गुजरात टायटन्सने ती पोस्ट डिलीट केल्याचं दिसून आले.