नवी दिल्ली : दुखापतग्रस्त यष्टिरक्षक फलंदाज वृद्धीमान साहा याच्या जागी अफगाणिस्तान कसोटी सामन्यात दिनेश कार्तिक याला भारताच्या कसोटी संघात संधी देण्यात आली आहे. आयपीएलदरम्यान सहाच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. भारतीय निवड समितीने साहाला आराम देत कार्तिकला संधी दिली आहे. दिनेश कार्तिकचे तब्बल आठ वर्षानंतर भारतीय कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. कार्तिकने त्याचा अखेरचा कसोटी सामना 2010 मध्ये बांगलादेशविरोधात खेळला होता. 14 जूनपासून बंगळुरूमध्ये ऐतिहासिक कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे.
सहाच्या दुखापतीवर सध्या बीसीसीआयचे डॉक्टर उपचार करत आहेत. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सहाला विश्रांती मिळावी आणि त्याची दुखापत पूर्ण बरी व्हावी म्हणून त्याला अफगाणिस्तानविरुद्ध खेळवण्यात येणार नाही अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
निवड समितीच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एमएसके प्रसाद यांच्या नेतृत्वातील निवड समितीमे इंग्लंड दौऱ्याला नजरेसमोर ठेऊन हा निर्णय घेतला आहे. कार्तिक इंग्लंड विरोधातील कसोटी मालिकेतही संघात स्थान मिळवू शकतो.
2004मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिनेश कार्तिकने भारतीय कसोटी संघात पदार्पण केले होते. कार्तिकने 23 कसोटी सामन्यामध्ये 1,000 धावा केल्या आहेत. दिनेश कार्तिक सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. निदाहास ट्रॉफीच्या फायनलमधील वादळी खेळी केली होती.