Wriddhiman Saha Junior Malinga, IPL 2022 GT vs CSK: गुजरात टायटन्स संघाने चेन्नई सुपर किंग्जविरूद्धच्या सामन्यात ७ गडी आणि ५ चेंडू राखून विजय मिळवला. ऋतुराज गायकवाडच्या अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईने गुजरातला १३४ धावांचे आव्हान दिले होते. याच्या प्रत्युत्तरात गुजरातचा सलामीवीर वृद्धिमान साहा याने नाबाद अर्धशतक झळकावत संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह गुजरातचे २० गुण झाले असून त्यांचे गुणतालिकेतील टॉप-२ मधील स्थान निश्चित झाले.
प्रथम फलंदाजी करताना चेन्नईचा सलामीवीर डेवॉन कॉनवे ५ धावांत माघारी परतला. मोईन अलीने ऋतुराज गायकवाडला साथ दिली. पण दोन षटकार लगावल्यानंतर मोईन अली २१ धावांवर बाद झाला. सलामीवीर ऋतुराज गायकवाडने जगदीशनच्या साथीने चांगली भागीदारी केली. ऋतुराजने ४९ चेंडूत ५३ धावांची खेळी केली. त्यात ४ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. तो बाद होताच शिवम दुबेही शून्यावर माघारी गेला. पाठोपाठ धोनीही ७ धावा काढून बाद झाला. जगदीशनने शेवटपर्यंत किल्ला लढवत नाबाद ३९ धावा केल्या आणि संघाला १३०पार मजल मारून दिली.
१३४ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातच्या फलंदाजीची सुरूवात चांगली झाली होती. पण शुबमन गिल १७ चेंडूत १८ धावा काढून बाद झाला. त्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्यादेखील ६ चेंडूत ७ धावांवर माघारी परतला. IPL कारकिर्दीत आपला पहिला सामना खेळणाऱ्या ज्युनियर मलिंग मथिशा पथिराना याने हे दोनही बळी टिपले. डावखुरा मॅथ्यू वेड फटकेबाजी करत होता, पण त्याला १५ चेंडूत २० धावांवर मोईन अलीने बाद केले. पण सलामीवीर वृद्धिमान साहाने नाबाद ६७ धावा ठोकल्या. त्यात ८ चौकार आणि १ षटकार समाविष्ट होता. त्याला डेव्हिड मिलरने (नाबाद १५) चांगली साथ दिली.