नवी दिल्ली-
श्रीलंका विरुद्धच्या मालिकेआधीच एक मोठा वाद उफाळून आला आहे. भारतीय कसोटी संघात यष्टीक्षक फलंदाज वृद्धीमान साहा याला स्थान देण्यात आलेलं नाही. यावरुनच वादाला सुरुवात झाली आहे. यात आता भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनीही उडी घेतली आहे. राजकुमार यांनी भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आणि त्याच्यावर जोरदार टीका देखील केली आहे.
खेलनिती नावाच्या पॉडकास्टमध्ये राजकुमार शर्मा म्हणाले की, गेल्या तीन-चार महिन्यांपासून भारतीय क्रिकेट संघात खूप वाद सुरू आहेत आणि हे भारतीय क्रिकेटसाठी चांगलं नाही. वृद्धीमान साहा प्रकरण पाहायचं झालं तर याबाबत प्रत्येकजण वेगवेगळं वक्तव्य करताना दिसत आहे. एखाद्या निवृत्ती घेण्यास सांगण्याचा कुणालाही अधिकार नाही, त्याबाबतचा निर्णय सर्वस्वी खेळाडूनं घ्यायचा असतो, असं राजकुमार शर्मा म्हणाले.
कोणत्या खेळाडूची निवड करावी आणि कुणाची करू नये हे वेगळं प्रकरण आहे. राहुल द्रविड यांनी भले वृद्धीमान साहा याच्याशी चांगल्या भावनेनं चर्चा केली असेल पण त्यावरुन आता वादाला फोडणी मिळाली आहे. बीसीसीआयनं अशा वादांपासूर दूर राहायला हवं, असंही ते म्हणाले. बीसीसीआयमध्ये प्रत्येक व्यक्तीची भूमिका जवळपास निश्चित करुन देण्यात आलेली आहे आणि त्या त्या व्यक्तीनं भूमिकेपर्यंतच मर्यादित राहायला हवं. संघात कुणाची निवड करायची यासाठी निवड समिती आहे. तो त्यांचा अधिकार आहे. वृद्धीमान साहाबाबत जो वाद निर्माण झाला आहे तो चांगला नाही. कारण तो एक सर्वोत्तम यष्टीरक्षक आहे, असंही विराट कोहलीचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा म्हणाले.
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा झाली आहे. यात रिषभ पंतसोबत केएस भरत याला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून भारतीय संघात सामील केलं आहे. वृद्धीमान साहा याला संघात स्थान देण्यात आलं नाही. त्यानंतर साहानं केलेल्या विधानानं वाद निर्माण झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यानंतरच निवड होणार नसल्याचे संकेत राहुल द्रविड यांनी दिले होते. तसंच निवृत्ती घेण्याचाही सल्ला त्यांनी दिला होता, असं विधान वृद्धीमान साहा यांनं केलं आहे.