Join us  

Wriddhiman Saha Boria Majumdar: वृद्धिमान साहाला धमकीचे मेसेज पाठवणाऱ्या पत्रकारावर BCCI दोन वर्षांची बंदी घालण्याची शक्यता

साहाला श्रीलंका टेस्ट सिरीजसाठी संघातून वगळल्यानंतर बोरिया मजुमदार या ज्येष्ठ क्रीडा पत्रकाराने त्याला काही धमकीचे मेसेज पाठवले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 1:19 PM

Open in App

Wriddhiman Saha Boria Majumdar: वृद्धिमान साहाला धमकीचे मेसेज पाठवणारे ज्येष्ठ पत्रकार बोरिय मजुमदार यांच्यावर BCCI कडून दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. श्रीलंका कसोटी मालिकेआधी साहाच्या फॉर्मवरून बरेच प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यानंतर त्याला निवृत्त होण्याचा सल्लाही BCCI मधून दिल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तशातच श्रीलंका मालिकेसाठी त्याला संघातून वगळण्यात आले. या सर्व प्रकारावर मुलाखत देण्यास साहाने मजुमदार यांना नकार दिला होता. त्यावेळी, बोरिया मजुमदार यांनी साहाला मेसेज करून धमकी दिली होती.

वृद्धिमान साहाने BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीबाबत काही विधाने केली होती. त्यानंतर बोरिया मजुमदार यांनी त्याला मुलाखतीसाठी विचारले होते. पण साहाने मात्र त्यास सकारात्मक प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे खवळलेल्या बोरिया मजुमदार यांनी त्याला मेसेज करत धमकी दिली. 'तू मला कॉल बॅक केला नाहीस. मी परत कधीही तुझी मुलाखत घेणार नाही. आणि हा मी माझा अपमान समजतो. मी माझा अपमान कधीही विसरत नाही. तू हे करायला नको होतंस', असे मेसेज मजुमदार यांनी केले होते.

घडलेल्या प्रकाराबाबत वृद्धिमान साहा याने थेट ट्वीटरवर स्क्रीनशॉट शेअर केला आणि त्याबद्दलची माहिती दिली. त्यानंतर BCCI ने साहाची चौकशी केली. BCCIशी करारबद्ध असलेल्या व्यक्तिने प्रोफेशनल माहितीबाबत कोणतीही गोष्ट घडल्यास थेट सोशल मीडिया गाठणे योग्य नसून त्यांनी त्याची BCCI ला कल्पना द्यायला हवी होती, असे BCCIने सांगितले. साहाच्या चौकशी दरम्यान, त्या पत्रकाराचे नाव समजले. त्यामुळे आता पत्रकारावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, वृद्धिमान साहाने सुरूवातीला पत्रकाराचे नाव सांगितले नव्हते. अनेक आजी-माजी क्रिकेटपटूने त्याला पत्रकाराचे नाव सांगण्यास सांगितले अखेर BCCI च्या चौकशीमध्ये त्याने नाव सांगितले.

टॅग्स :वृद्धिमान साहाभारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध श्रीलंकाबीसीसीआय
Open in App