टीम इंडियाला घरच्या मैदानातील कसोटी सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने ३-० अशी मात दिली. एका बाजूला भारतीय संघाच्या या पराभवाची चर्चा रंगत असताना दुसऱ्या बाजूला टीम इंडियाकडून खेळलेल्या स्टार क्रिकेटरनं क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.
कोण आहे तो क्रिकेटर ज्याने केलीये निवृत्तीची घोषणा?
हा खेळाडू बराच काळ भारतीय कसोटी संघाचाही भाग राहिला होता. आता हा खेळाडू कोण? असा प्रश्न पडला असेल? ज्या भारतीय क्रिकेटनं क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतलीये त्या क्रिकेटरचं नाव आहे वृद्धिमान साहा.वृद्धिमान साहा २०१० ते २०२१ या कालावधीत भारतीय संघाकडून ४० कसोटी सामने खेळला आहे. याशिवाय ९ वनडे सामन्यातही त्याने भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये मात्र त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
एक नजर त्याच्या कसोटी अन् वनडेतील कामगिरीवर
४० कसोटी सामन्यात त्याने २९.४१ च्या सरासरीनं १३५३ धावा केल्या आहेत. ११७ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे. वनडेत तो आपली छाप सोडण्यात कमी पडला. ९ वनडेत त्याच्या खात्यात फक्त ४१ धावा जमा आहेत. आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात त्याला संधी मिळाली नसली तरी आयपीएलच्या माध्यमातून त्याने क्रिकेटच्या छोट्या प्रकारात मोठी कामगिरी करून दाखवली आहे.
आयपीएलमधील कामगिरी
वृद्धिमान साहानं आयपीएलमध्ये पाच फ्रँचायझी संघाचे प्रतिनिधीत्व केले. यात कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स, पंजाब किंग्स, सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स या संघांचा समावेश आहे. आयपीएलमधील १७० सामन्यात त्याने २९३४ धावा केल्या आहेत. साहा देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगाल संघाकडून खेळतो. सध्याच्या घडीला तो या संघाकडून रणजी स्पर्धेत उतरला आहे. या स्पर्धेनंतर तो आयपीएलमध्येही सहभागी होणार नाही, असे समोर आले आहे.
काय म्हणाला साहा?
क्रिकेटचा आतापर्यंतचा प्रवास खूपच छान होता. रणजी सामन्यानंतर मी थांबतोय. या अविश्वसनीय प्रवासात माझ्यासोबत असणाऱ्या सर्वांचे आभार. शेवटची स्पर्धा अविस्मरणीय करण्यासाठी प्रयत्नशील आहे, अशा शब्दांत त्याने निवृत्तीनंतरच्या आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
Web Title: Wriddhiman Saha to retire from all forms of cricket after ongoing Ranji Trophy
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.