World Test Championship standings After South Africa beat Sri Lanka : मार्को यान्सेन यानं दोन्ही डावात केलेला भेदक मारा आणि ट्रिस्टन स्टब अन् कॅप्टन टेम्बा बवुमा यांनी दुसऱ्या डावात केलेली शतकी खेळी याच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या संघानं किंग्समेड, डरबनच्या मैदानात श्रीलंकेचा धुव्वा उडवला. घरच्या मैदानातील २ कसोटी सामन्यांच्या द्विपक्षीय मालिकेतील पहिला सामना २३३ धावांनी जिंकत दक्षिण आफ्रिकेनं मालिकेत १-० अशी आघाडी तर घेतली आहे.
ऑस्ट्रेलियाला धक्का टीम इंडियाचंही वाढवलं टेन्शन
दक्षिण आफ्रिकेच्या संघानं या विजयासह ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाचं टेन्शनही वाढवलं आहे. कारण लंकेविरुद्धच्या विजयासह दक्षिण आफ्रिकेच्या संघानं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीत मोठी झेप घेतलीये. ऑस्ट्रेलियाला खाली खेचत दक्षिण आफ्रिकेचा संघ पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहाचलाय. यासोबतच त्यांनी आता टीम इंडियाचं टेन्शनही वाढवलं आहे.
टीम इंडिया टॉपला, पण...
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील गुणतालिकेत भारतीय संघ सध्या अव्वलस्थानावर आहे. १५ सामन्यातील ९ विजय, ५ पराभव आणि १ अनिर्णत सामन्यासह भारतीय संघाच्या खात्यात ११० गुण जमा आहेत. टीम इंडिया ६१.११ विजयी टक्केवारीसह अव्वलस्थानी आहे. पण भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून ५ कसोटी सामन्यातील मालिकेतील उर्वरित ४ सामन्यात टीम इंडियासमोर तगडे आव्हान असेल. एक पराभवामुळे टीम इंडियेच अव्वलस्थान धोक्यात येऊ शकते. दुसरीकडे श्रीलंकेविरुद्धचा दुसरा सामनाही मोठ्या फरकाने जिंकून दक्षिण आफ्रिकेचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीत पुढे निघून जाऊ शकतो.
दक्षिण आफ्रिका जोमात, श्रीलंका कोमात
दक्षिण आफ्रिकेच्या संघानं ९ सामन्यात ५ विजय, ३ पराभव आणि एका अनिर्णित सामन्यासह ६४ गुण आपल्या खात्यात जमा केले आहेत. त्यांचे विनिंग पर्सेंटेज हे ५९.२६ असे असून ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थाानवर आहेत. त्यापाठोपाठ या यादीत ऑस्ट्रेलियाचा नंबर लागतो. कांगारुंच्या संघाने १३ सामन्यातील ८ विजय, ४ पराभव आणि एका अनिर्णित सामन्यासह ९० गुण खात्यात जमा केले असून ५७.६९ टक्के विजयी टक्केवारीसह ते तिसऱ्या स्थानावर आहेत. न्यूझीलंडचा संघ या यादीत ११ सामन्यातील ६ विजय, ५ पराभवासह ७२ गुण आणि ५४.५५ विनिंग पर्सेंटेजसह चौथ्या स्थानावर असल्याचे दिसते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवामुळे श्रीलंकेची गणित बिघडली आहेत. १० सामन्यातील ५ विजय ५ पराभवासह ६० गुणांसह ५० विनिंग पर्सेंटेजसह ते गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहेत.
इंग्लंड पाकसह हे चार संघ तळागाळात इंग्लंडचा संघ ४०.७९ विजयी टक्केवारीसह सहाव्या, पाकिस्तान ३३.३३ विजयी टक्केवारीसह सातव्या तर वेस्ट इंडिज आणि बांगालादेशचा संघ अनुक्रमे २६.६७ आणि २५ विनिंग पर्सेंटेजसह आठव्या आणि नवव्या स्थानावर आहे.