IND vs AUS, WTC 2023 Final: जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा विजेतेपदाचा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पुढील महिन्यात ओव्हल येथे ७ ते ११ जून या कालावधीत होणार आहे. भारताने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. मागच्या वेळी न्यूझीलंडने भारताचे कसोटीत जगज्जेते होण्याचे स्वप्न मोडले, पण यावेळी रोहित शर्माच्या संघाने कंबर कसली आहे. विराट कोहलीसह अनेक भारतीय खेळाडूंनी इंग्लंड गाठून तयारीही सुरू केली आहे. याच दरम्यान, या स्पर्धेच्या विजेतेपदाच्या बक्षिसाची रक्कम जाहीर झाली आहे.
बक्षिसाची रक्कम नक्की किती?
ऑस्ट्रेलियाने आपल्या खेळाडूंना तंदुरूस्त राहायला सांगितले आहे तसेच भारतीय खेळाडूही पूर्ण जोर लावात आहेत. या दरम्यान, आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. आयसीसीने शुक्रवारी जाहीर केले की एकूण बक्षिसाची रक्कम 31 कोटी 39 लाख 42 हजार 700 रुपये हे 9 संघांमध्ये वितरित केले जातील. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना खेळला जाईल, याचा अर्थ दोन्ही संघांना उर्वरित संघांच्या तुलनेत सर्वाधिक बक्षीस रक्कम मिळेल. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या चॅम्पियनला 13.2 कोटी रुपये बक्षीस रक्कम मिळणार आहे, तर उपविजेत्या टीमला 6.5 कोटी रुपये मिळतील.
बक्षिसाच्या रकमेत सध्या कोणताही बदल झालेला नाही. चॅम्पियनशिपच्या पहिल्या आवृत्तीच्या चॅम्पियन आणि उपविजेत्या संघालाही तेवढीच बक्षीस रक्कम देण्यात आली होती. केन विल्यमसनच्या न्यूझीलंडने भारताचा 8 गडी राखून पराभव केला आणि विजेतेपदासह 13.2 कोटी रुपये कमावले होते.
इतर संघांपैकी कोणाला किती पैसे?
भारत आणि ऑस्ट्रेलियापैकी कोण 13.2 कोटी रुपयांचे बक्षीस घेऊन मायदेशी परतणार, यासाठी चाहत्यांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. मात्र या दोन संघांव्यतिरिक्त कोणत्या संघाला किती रक्कम मिळणार आहे, याची ICC ने घोषणा केली आहे. चॅम्पियनशिपमध्ये दक्षिण आफ्रिकेला तिसरे स्थान मिळाले आगे. त्यामुळे त्यांना 3 कोटी 71 लाख 78 हजार 325 रुपये मिळतील. तर चौथ्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंड संघाला 2 कोटी 89 लाख 16 हजार 475 रुपये मिळतील.
पाकिस्तानलाही मिळणार 82 लाखांचे बक्षिस
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीत कडवी झुंज देणारा श्रीलंका 5 व्या स्थानावर होता. त्याला 1 कोटी 65 लाख 23 हजार 700 रुपये मिळतील. तर सहाव्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंड, सातव्या क्रमांकावर असलेला पाकिस्तान, आठव्या क्रमांकावर असलेला वेस्ट इंडिज आणि नवव्या क्रमांकावर असलेल्या बांगलादेशला प्रत्येकी 82-82 लाख रुपये मिळतील.